बोधकथा

म्हसोबाचे डोळे

क्रांतिसिंह नाना  पाटील आपल्या भाषणातून समाजातील अंधश्रद्धेवर मार्मिक प्रहार करीत असत. विसाव्या शतकातील ग्रामिण महाराष्ट्राचे ते सर्वाधिक लोकप्रिय वक्ते होते. त्यांच्या जीवनातील त्यांनीच भाषणात सांगितलेली ही एक कथा.

नाना एकदा अंकलखोपला गेले होते.अंकलखोपचा म्हसोबा जागृत व जहाल देव मानला जात असे. नानांनी एक गंमत करायचे ठरवले.त्यांनी म्हसोबाचे चांदीचे डोळे काढून आणले. त्याबद्दल म्हसोबा त्यांना काय शिक्षा करतो ते पहायचे होते. पण चार महीने झाले तरी नानांना काहीच होईना.ते पुन्हा एकदा अंकलखोपला गेले. मंदिराच्या पुजार्‍याला म्हणाले," म्हसोबाचे  डोळे  चोरणार्‍यास काय होईल हो दादा ?" पुजारी म्हणाला,'जुलाब ,रक्तशेंबीची हगवण लागून तो आतापर्यंत मेला देखील असेल. नानांनी खिशातले डोळे काढले व ते पुजार्‍याला दिले आणि म्हणाले ,"मीच डोळे नेले होते ,मला काहीच कसे झाले ना।ही?" पुजारी महाहुशार . तो म्हणाला ,मग बरोबर आहे . त्याला डोळेच नाही ,तर तो तुमच्याकडे कसे बघणार?

तात्पर्य : अंधश्रध्देमुळे ज्यांचा फायदा होतो असे लोक चलाख युक्तीवाद करून अंधश्रध्देचे समर्थन करीत असतात.त्यांच्यापासून सावध रहायला हवे.

(कथा दै. संध्याकाळमधून)