सखे, आठवतं ते आपलं
पावसात चिंब-चिंब भिजणं
पावसातल्या पाण्यात
एकमेकांच प्रतीबिंब पाहणं
ओला स्पर्श होताच
तुझं मोहक लाजणं
पण आता, हा देह एकटा भिजलाय,
मनावर मात्र कोरडा पडलाय
सखे, त्याला तु ओली आठवण देशील का?
सखे, तु पुन्हा माझ्यासोबत भिजशील का?
सखे, आठवतं ते माझं
तुझ्यावर कविता करणं
पण त्या कविता तुला
कधीच न कळणं
प्रत्येक कवीतेला मात्र
तु मनापासुन दाद देणं
पण आता जणु लेखणीच्या
शाईचा थेंबनथेंब गोठलाय
सखे त्यात तु उत्साहाची
नवी शाई भरशील का?
सखे, माझ्या लिखाणाला
तु पुन्हा दाद देशील का?
सखे, आठवतं ते तुझं
नेहमीचं स्वप्नात येणं
रात्रभर जागुन त्या
चंद्र, चांदण्या पाहणं
तुझ्या डोळ्यात पाहुन
तासनतास तुझ्याशी गप्पा मारणं
पण आता, जणू तो
चंद्रही माझ्यावर रुसलाय,
अंधा-या ढगांमागे लपुनी बसलाय
सखे, त्याला तु समजावशील का?
सखे, तु पुन्हा स्वप्नी येशील का?
सखे, आठवतं ते
कधीकधीच आपल भांडण
भांडल्यावर तुझं
ते उगाचच रुसणं
कमीपणा घेऊन दरवेळीचं
माझं तुला समजावणं
पण आता, सगळा डावंच मोडलाय,
सखे, माझं काय चुकलं ते तरी सांगशील का?
सखे, तु पुन्हा माझ्याशी भांडशील का?
सखे, आठवतं ते मनाचं
नेहमीच तुझ्यासाठी हरणं
जिकंल्यावर तुझं
गाली खट्याळ हसणं
विजयाच्या आनंदात
गर्वाने तुझं मला चिडवणं
पण आता, तो खेळण्याआधीच जिंकलाय
सखे, त्याला तु हरवशील का?
सखे, माझ्यासाठी तु पुन्हा जिंकशील का?
सखे, आठवतं ते तुझं लाजणं ,
तुझं हसणं, चिडवणं
माझी साथ सोडून जाताना
निशब्द होऊन तु माझं काळीज तुडवणं
तु गेलीस मात्र हा वेडा
त्याच वाटेवर थांबलाय
जरा, मागे वळूनी पाहशील का ?
सखे, तु पुन्हा परतुनी येशील का?
सखे, तु पुन्हा माझी होशील का?
सखे, तु पुन्हा माझी होशील का?
सचिन काकडे [ऑगस्ट ०८, २००७]