चोर घरी यावेत असे कुणाला वाटत असेल असे नाही पण चोराना मात्र सगळ्यांकडे जावेसे वाटते. चोर कोणाच्या घरी जावे हे कसे ठरवतात हा मला नेहमी प्रश्न पडतो. एकाद्या ठिकाणी डबोल मिळणार अशी कुणकुण लागल्यावर तेथे चोरांनी जाणे हे समजू शकते म्हणजे खूप परिश्रमपूर्वक बँका किंवा सोन्याचांदीच्या दुकानावर ते धाड घालतात यात काही आश्चर्य नाही पण आमच्यासारख्या कफल्लकांवरही मेहेरनजर करून आमची दारिद्र्यरेषेतून बढती केल्याचे पुण्य त्यांना लाभले तरी त्यांच्या गाठी मात्र काहीच पडत नाही हे त्यांना कसे समजत नाही कुणास ठाऊक, कदाचित कोणे एके काळी चारुदत्तासारख्या निष्कांचन माणसाकडे दागिन्यांचे घबाड सापडल्याचा दाखला शर्विलकांनी म्ह.चोरांच्या पूर्वजानी त्यांना दिल्यामुळे असाही एकादा प्रयत्न फुरसतीच्या काळात करायला हरकत नाही हाच आमच्या घराच्या भेटीमागे त्यांचा विचार असावा.
चोर येऊन गेल्याचा एक फायदा मात्र होतो तो म्हणजे आपली बरीच प्रसिद्धी होते. ज्याना येनकेन प्रकारेण प्रसिद्धपुरुषो भवेत् अशी इच्छा असते त्यांना हा चांगला योग असतो पण ही प्रसिद्धी फार आनंददायक असते असे काही मला वाटत नाही.कारण ती बातमी कळताच आपल्या समाचारास येणाऱ्या लोकांकडून चोर येऊ नयेत म्हणून आपण दारेखिडक्या कशी बंद करायला हवी होती हा आता उपयोगी न पडणारा सल्ला आपल्याला ऐकावा लागतो. आपण ज्या घरात रहातो त्या घराच्या रचनेतील निरनिराळ्या इतक्या चुका ते आपल्याला दाखवतात की अशा असुरक्षित घरात इतके दिवस चोरी कशी झाली नाही याचेच आपल्याला नवल वाटायला लागते. येवढेच काय पण दुर्दैवाने ते घर आपणच बांधले असले तर ते पाडून पुन्हा नव्याने बांधावे असे वाटू लागते. चोरानी जर घरातील रोकड किंवा सोन्याचे दागिने वगैरे नेले असतील तर दागिने बॅंकेत लॉकरमध्ये का ठेवले नाहीत याचा जाब द्यावा लागतो तसेच एवढी रोकड घरात ठेवू नये अशी प्रेमळ दटावणी ऐकावी लागते.आपल्या पाठीमागे मात्र एवढी रक्कम अथवा दागिने ज्याअर्थी आपण घरात ठेवले त्याअर्थी त्यांच्या प्राप्तीमागे आपली काहीतरी भानगड असावी असा अंदाज केला जातो आणि हपापाचा माल गपापा झाल्याबद्दल हे असेच होणार असा अभिप्रायही व्यक्त केला जातो. अर्थात हे सर्व आपल्यावरील प्रेमापोटीच होते हे उघडच आहे.त्यातल्या काहीजणांना जर चोरी होऊनही आपले काहीच गेले नसेल तर त्याचेच ( मनातल्यामनात) वाईट वाटते कारण यापूर्वी या लोकांचे घर काही इतर चोरांनी धुवून नेलेले असते.
काही लोक चोरांना फारच आवडतात.या लोकांनी कितीही वेळा घरे बदलली असो वा त्यांच्या घरात काही ऐवज मिळालेला असो वा नसो पण त्यांच्या घरास मधूनमधून भेट देणे हे आपले कर्तव्यच आहे असे का कोण जाणे चोरांना वाटत असते. माझी गणना अशा चोरांच्या लाडक्या लोकांत होत नसली तरी चोरांनी कधीच भेट दिली माही अशा सुदैवी लोकांतही माझी गणना होत नाही.
मला आठवते तशी आमच्या घरात पहिली चोरी मी अगदी लहान असताना झाली. म्हणजे मी फार तर तीन चार वर्षाचा असेन त्यावेळी! अर्थात मी मोठा असतो तरी चोरांना हाकलून लावण्यात मी फार मोठा हातभार लावला असता अशातला भाग नाही. त्यावेळी प्लेगच्या साथीमुळे आम्ही सर्व ग्रामस्थ गावातील घरे सोडून गावाबाहेर माळावर झोपड्या बांधून रहात होतो अशावेळी गावातली आमची घरे आयती मोकळी पडलेली असताना आमच्या झोपड्याना भेट देण्याची लहर चोरांना का आली कुणास ठाऊक ? कदाचित त्या घरात शिरलो तर आपल्यालाही प्लेगची लागण होईल अशी भीती त्यांना वाटली असावी आणि समजा आमच्याकडे काही चीजवस्तु असलीच तर ती आम्ही झोपडीतच नेली असणार असा तर्क त्यानी केला असणार आणि तशी झोपडी बांधीव घरापेक्षा फोडायला सोपी हा त्यांचा अंदाज ! पण झोपड्यातले लोक जवळजवळ असल्याने एकमेकाला जागे करतील हे त्यांच्या लक्षात न आल्याने त्यांचा प्रयत्न यशस्वी होण्यापूर्वीच " चोर चोर" असा आरडाओरडा झाला आणि माझे वडील आणि शेजारी पळतपळत बाहेर पडल्याचे पहाटे कानावर पडल्यामुळे मलाही जाग आली आणि चोर घरात किंवा आसपास येऊन गेले हे मला समजले.
त्यानंतर मधल्या काळात बरीच वर्षे चोरांना आमची आठवण झाली नाही.कदाचित त्याहून महत्त्वाच्या मोहिमा पार पाडण्यात ते गुंतले असावेत. पुढे आम्ही औरंगाबादला स्थायिक झालो आणि एका बंगल्याच्या औटहौसमध्ये आम्हाला भाड्याने रहायला जागा मिळाली.तेव्हां ते अगदी सुरक्षित शहर आहे असा तेथील रहिवाशांचा समज होता त्याचे एक उदाहरण म्हणजे सायकल भाड्याने घेतली तर तिला कुलुप नसायचे आणि ती चोरीला जाणार नाही अशी सायकलच्या दुकानदारास खात्री असे. त्यामुळे औटहौसच्या मालकालाही चोर औटहाउसमध्ये मुद्दाम परिश्रमपूर्वक चोरी करतील असे वाटत नसावे, किंवा त्याला तेथे रहायचे नसल्याने त्याच्या ऐवजाला काही धोका नव्हताच त्यामुळे त्या घराची रचना चोरांच्या दृष्टीने अगदी आदर्श असली तरी त्याचे त्यांना ( म्हणजे मालकांना , चोरांना नव्हे) मुळीच सोयरसुतक नव्हते. तसे पहाता त्या औटहाउसमध्ये रहाणाऱ्या आमच्यासारख्या भाडेकरूंची आर्थिक परिस्थिती खरे तर चोरीच्या दृष्टीने मुळीच आदर्श नव्हती ,पण हे चोरही शर्विलकाचे वंशज असावेत ! पण अपेक्षेप्रमाणेच बिचाऱ्याच्या हातास यश नव्हते. सताड उघड्या खिडकीच्या दारावर लटकवलेली वडिलांची काठी सहजपणे त्याच्या हाती आली.तिचा वापर करून भिंतीवरील खिळ्यास अडकवलेली माझी पँट व वडिलांचे धोतर त्याच्या हाती लागले.पँटच्या खिशाची पहाणी करून त्यात काहीच न सापडल्यामुळे बरीच भोके पडलेले धोतर व माझी पँट या बोहारणीनेही नाकारलेल्या वस्तु काठीसह अंगणात टाकून चोरान पलायन केले होते. सकाळी फिरायला जाताना वडील काठी शोधू लागल्यावर चोरांच्या या भेटीचा पत्ता आमच्याबरोबर आमच्या शेजाऱ्यानाही लागला आणि आमच्यापेक्षा चोराविषयीच जास्त हळहळ त्यांनी व्यक्त केली.
या भेटीमुळे चोरांचा आम्ही घेण्याऐवजी चोरांनीच आमच्या घराचा इतका धसका घेतला की त्यामुळे त्यानी बरेच दिवस आमचे घर टाळले. त्यानंतर अनेक वर्षानी ज्या घरात आम्ही भाडेकरू म्हणून रहात होतो त्याचे घरमालक चोरांचे फारच लाडके होते.आम्ही त्यांच्या घरात रहायला लागण्यापूर्वी त्यांच्या घरास चोरांनी बऱ्याच भेटी दिल्या होत्या पण आमचा लौकिक माहीत असल्याने यावेळी चोरांनी त्यांच्या घराऐवजी आमच्या शेजारच्या घरास भेट देऊन पाहू असा विचार केला. त्या घराची एक खिडकी आम्ही रहात असलेल्या घराच्या आमच्या भागास अगदी लागून होतीआणि अंगणाच्या जमिनीपासून इतक्या कमी उंचीवर होती की दार उघडून घरात शिरण्यापेक्षा तिचे गज कापून घरात शिरणेच चोराला अधिक सोपे वाटले.त्या खिडकीपाशीच घरातला कर्ता पुरुष झोपला होता आणि तो एवढ्या जोरात घोरत होता की चोरास ते जणु एक प्रकारे आवाहनच वाटले ,गज कापण्याच्या आवाजाने त्या थोर पुरुषाला जाग आली नाहीच पण त्याच्या कुटुंबियानाही गज कापण्याचा आवाज हाही त्याच्या घोरण्याचाच भाग वाटला असल्यास नकळे ! किंवा तो चोराच्या कौशल्याचाही भाग असेल पण दुर्दैव बिचाऱ्याचे,कारण एवढ्या कौशल्याने गज कापून तो घरात शिरायला आणि घरातले तान्हे मूल जागे होऊन रडायला लागायला एकच गाठ पडली आणि मुलाची आई जागी झाली.मुलाला थोपटून गप्प करून ती बाथरूमकडे जऊ लागली तो चोरमहाशय तिच्या नजरेस पडले. अर्धवट झोपेत असल्याने या घटनेचे गांभीर्य बिचारीच्या लक्षात न आल्याने "कोण आहे ?" एवढाच प्रश्न झोपेतल्याझोपेत तिने विचारला, चोरमहाशयानी तेवढ्यात प्रसंगावधान दाखवून " बाई, दुधाच्या बाटल्या न्यायला आलोय" असे उत्तर दिले.बाई अजून झोपेतच होत्या त्यामुळे पुन्हा त्याच अवस्थेत त्यांनी" इतक्या लवकर रे कसल्या बाटल्या ?" असे विचारले आणि एकदम लखकन् वीज चमकावी तशा त्या भानावर आल्या आणि विचारू लागल्या " पण तू आत कसा आलास?"मग मात्र आपले बिंग उघडकीस आले हे लक्षात येऊन चोराने पळत बाहेरील दरवाजा गाठला आणि तो उघडून पळ काढला.बाई मात्र खऱ्याच धीराच्या,शांतपणे दरवाजा बंद करून झोपल्या.खिडकीला पडदा असल्याने गज कापल्याचे काही त्यांच्या ध्यानात आले नाही चोरमहाशय घराबाहेर पडून आपल्या इतक्या परिश्रमावर पाणी पडल्यामुळे हळहळत चालत पुन्हा त्याच खिडकीपाशी आले.बाई काही आरडाओरडा न करता शांतपणे झोपल्यामुळे चोरास तेथून पळून जाण्याचे कारण उरले नाही.एवढी गज कापण्याची मेहनत करून आत शिरलो पण काम पूर्ण न करताच बाहेर पडलो याचा पश्चाताप त्यास होत असणार आणि त्याचबरोबर आता दुसऱ्या घरात शिरायचे म्हणजे पुन्हा पहिल्यापासून सुरवात करावी लागणार याचाही धसका त्याने घेतला असणार किंवा घराच्या दारातून बाहेर पडल्यामुळे त्या गल्लीत शिरल्यावर आपण कुठल्या घरातून बाहेर पदलो हे त्याच्या ध्यानात राहिले नाही की काय कोण जाणे पण त्यामुळे गज कापलेली खिडकी दिसताच ही आपल्यासाठी आणखी एक संधी आहे या समजुतीने तो पुन्हा त्याच खिडकीतून आत शिरू लागला पण यावेळी मात्र खिडकीजवळ झोपलेल्या गृहस्थाची झोप पुरी झाली असावी त्यामुळे चोराचा घरात प्रवेश होण्यापूर्वीच त्याना जाग येऊन त्यानी आरडाओरडा करायला सुरवात केली तेव्हा मात्र आपला प्रयत्न अर्धवट सोडणेच इष्ट हे ओळखून चोरसाहेबानी पोबारा केला.मीही खिडकीखालच्या गृहस्थासारखाच पण माझ्या घरात घोरण्यात दंग होतो त्यामुळे हा सर्व वृत्तांत आमच्या सौभाग्यवतीने एकाद्या टी.व्ही.मालिकेप्रमाणे अगदी तिच्यासमोर घडावा अशा थाटात मला निवेदन करीपर्यंत या सगळ्या महाभारताचा पत्ता मलाही नव्हता.
आजकाल चोरांच्या भयानक कृत्यांच्या बातम्या वाचल्यावर आम्हाला भेट देणारे चोर फारच प्रेमळ होते असे म्हणावे लागेल. अर्थात त्याहूनही बेरकी चोर या ना त्या पद्धतीने जवळजवळ आपल्या खिशात हात घालूनच किंवा आपण बँकेत सुरक्षित म्हणून ठेवलेल्या आपल्या पैशावर डल्ला मारतात तेव्हा ते पहात बसणे यापलिकडे आपण काय करू शकतो?