प्रश्न सारे जीवघेणे
तरीही वेचितो मी फुले
मांगल्य ओठी, मांगल्य देही
अमंगल ते अंतरात उमटे.
चक्रास भेदिले त्यांनी
मी तो एक कणा निपजे
चक्रवाही, चक्रवादी,
तरी चक्रगती मला न उमजे.
प्रेरणेच्या प्रकाशात ते
अन् स्मृतीच्या काळोखात मी
पाण्याचे असणे असले
नाव मी शोधीत फिरे.
दंडित मने, सुवर्णाची अक्षरे,
निर्हेतुक अश्रू, सहेतुक माया
हे कुणास्तव अन् ते कुणास्तव
प्रश्नचिन्ह जसेच्या तसे.
एक नक्षत्र अवकाशी,
एक पक्षी माझिया दारी
वेध नाही, आदि नाही, अंत नाही
निश्चलाचे सारे तुकडे.
ऐलतीरावर जगणे
अन् पैलतीरी पाहणे
लागली अट्टाहासांची समाधी
कृतार्थता फक्त हिशेबात उरे.