सर्वत्र क्षेम.
कल्याण.
अख्खी, अस्ताव्यस्त रात्र.
हात बांधत बांधत आलेली झोप.
घाईघाईत झालेला गजर.
गजर संपल्यावर उगीच पडणारे टोले.
ओरडणाऱ्या कुत्र्याच्या आयुष्याचे वैषम्य.
निसरड्या रस्त्यातून वाहणाऱ्या अंगांवरचे कवित्व.
अपराध पोटात घेत घेत स्वतःला पारख्या होणाऱ्या स्वतःची गंमत.
जड जड होत जाणारी सात्त्विक घृणा.
आणि निवत निवत संपत जाणारी रात्र.
अख्खी, अस्ताव्यस्त रात्र.
बाकी सर्वत्र क्षेम.
कल्याण.