१५ ऑगस्ट, वसंत बापटांच्या नजरेतून..

आज १५ ऑगस्टच्या निमित्ताने वसंत बापटांची '१५ ऑगस्ट' ही उपरोधिक शैलीतील कविता मनोगत वर देत आहे.प्रथम वर्ष बी.ए.ला ही कविता अभ्यासायला होती.मला तरी आंतरजालावर ही कविता कुठेच मिळाली नाही.सुदैवाने बी.ए.चं पुस्तक मिळाल्याने देता आली.

                    

                १५ ऑगस्ट
     
      फिरत राहते यंत्रारूढ जडमूढ धरती
    -आजदेखील उजाडलेच लाल किल्ल्यावरती
      गर्दन छाटली होती तरी झेंडा उंच गेलाच
      छाती फाटली होती तरी आम्ही घोष केलाच

      उजाडताच मास्तरांनी केले ढोरवळण
      रेडिओने दळून टाकले सालाबादचे दळण
      शेटजींनी काल धुतली गांधी टोपी मळकट
      आज म्हटले-नेहरूंचे हात करा बळकट

      सनातन संस्कृती!वय वाढले आज
      वाढत्या वयात तशी थोडी कमीच होते लाज
      थोडे अवसान आणले तर छाती फुगते पोचट
      अन्नब्रह्मासाठी होतात देवदेखील लोचट

      तोंडपाटील चावडीवरती जेव्हा ढोल झडले
      तेव्हा म्हणतात...आघाडीवर पहिले बर्फ पडले!

                                                    -वसंत बापट