वीस लाख नाणी वाया गेलीत..?

              
                                  ’वीस लाख नाणी वाया गेलीत?’

साधारण ३१ जुलैच्या सुमारास वर्तमानपत्रात, ’वीस लाख नाणी वाया गेलीत?’ असे काहीसे शीर्षक असलेली एक बातमी वाचली. बातमीचा सारांश असा होता- लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त भारत सरकार लोकमान्यांची मुद्रा असलेल्या नाण्याचे प्रकाशन करणार होते; जवळ जवळ वीस लाख नाणी तयार सुद्धा झाली होती, परंतु ऐन वेळेला हा कार्यक्रम रद्द करावा लागला, कारण?..नाण्याच्या एका बाजूस असलेला मुद्रण दोष!  लोकमान्यांचे नाव ’बाल गंगाधर तिलकजी’ असे मुद्रित झाले होते, आणि कुठल्याही थोर व्यक्तीचे नाव नाण्यावर मुद्रित करताना त्यात ’जी’ लावल्या जात  नाही, अशी पद्धत आहे.  अनावधानाने ही चूक राहून गेली, असे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडुन सांगण्यात  आले.चुकीने मुद्रित झालेला हा ’जी ’, प्रोटोकॉल’ मधे बसत नसल्यामुळे सगळीच्या सगळी वीस लाख नाणी रद्द करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला.
ही बातमी वाचून हळहळ वाटली आणि काही प्रश्न माझ्या मनात सहज तरळून गेलेत, ते असे-

१) एक साधा प्रोटोकॉल जपण्यासाठी वीस लाख नाणी रद्द करणे, अणि एका प्रकारे राष्ट्रीय संपत्तीचा नाश होऊ देणे-मग तो कितीही कमी किंवा जास्त प्रमाणात का असोना, कितपत योग्य आहे?- असा प्रश्न अर्थ-खात्याला हा निर्णय घेताना पडला नसेल का?

२) नाण्याची प्रतिकृती जेव्हा मंजूरीसाठी गेली असेल तेव्हा ही चूक संबंधितांच्या ध्यानात आली नसेल का?

३) ह्या ’जी’ मुळे नाण्यांची चलनी किंमत कमी किंवा जास्त झाली असती का?

४)  ’प्रोटोकॉल’  महत्वाचा की एखाद्या थोर व्यक्तीचे कर्तृत्व,त्यांची स्मृती महत्वाची?

५) आपण भारतीय लोक बरेचदा अगदी किरकोळ बाबींचा उगीचच किस पाडत बसत नाही का?

६) सर्वच कार्यक्षेत्रात, मग सरकारी असो वा खासगी असो, व्यवस्थापन कौशल्याचे, आणि योजनाबद्ध रितीने काम करण्याचे  मूलभूत पाठ घेणे सर्वांसाठीच अनिवार्य नसावे का?

                                                             -मानस६

 टीप- ’गलथानपणा करणे हा भारतीयांचा जन्म-सिद्ध हक्क आहे आणि तो ते निभावतातच’ असे आपणास वाटत नाही का?