भेगाळलेली जमीन.
पाण्याची ओढ.
गहिऱ्या कोरडेपणातूनही फुटू पाहणारे कोंब.
ताठ मानेने सावली देत उभं असलेलं ते प्रचंड झाड.
वाट चुकलेल्या सावल्या.
सगळ्या अपेक्षा आणि निष्ठा घराला वाहून टाकणारी ती स्त्री.
जगण्याला निरपेक्ष आकार देण्याकरता धडपडणारा तिचा पुरुष.
गावाबाहेरच्या धडधडत जाणाऱ्या आगगाडीकडे अनिमिष कुतुहलाने बघणारी लहान मुलं.
एका मोठ्या विसंवादी गर्दीतले अनेक लोक.
विसंवादी सृजनाचा त्यांचा आनंद.
आणि 'मला तुझं काहीच कळत नाही रे' असं म्हणणारी तू.
तुझा हात हातातून सुटल्यापासून मला हे सगळं दिसू लागलंय्.
साधारण संपूर्ण.