सोसल्या तिने कळा...

सोसल्या तिने कळा अन्

घाव रातीचा सावळा

आषाढाचे उत्कट हिसके

अन् वृक्षांचे संभोग मुळां.

मध्यान्हीची सूर्यपाखरे

अबोल वंचित वेलींचे झुले

तिच्या शरीरी काजळ दाटे

मिठीत जेव्हा समुद्र मिसळे.

अंधाराचे काळोखे शव

फांद्यांचे त्यावरी हस्तलाघव

समीप येते वीज विखारी

परी विरागी नाचे शैशव.

ओढ मातली मायेची अन्

रुतल्या साऱ्या जन्मखुणा

ओळखीच्या हाकेने जर्जर

तिच्या बावळ्या जन्मखुणा.

दर्शनाचे गूढ सारे

सृष्टीचा चालेच चाळा

सांज सारी कोळपते अन्

चंद्र गेला गं आभाळा!