एक शून्य मी

परवाचीच गोष्ट. किराणाभुसार दुकानात काड्याची पेटी घ्यायला गेलो होतो. गोड्या तेलासाठी भलीमोठी रांग होती. माणसे मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. दुकानदार डोळ्यांत तेल घालून थेंबाथेंबाचा दाम दसपटीने वसूल करत होता. तेवढ्यात त्या रांगेतल्या एका फाटक्या परकरपोलक्यांतील पोरीचा नंबर लागला. तिने दुकानदाराकडे मातीची पणती ठेवली. दुकानदार, "तेलाचं भांडं कुठाय?" म्हणून खेकसला.

ती म्हणाली, "येवढं पणतीभर द्या."

"अगं, दिवाळीला अवकाश आहे! पणत्या कसल्या लावतेस?"

पोरगी गांगरली. पण दारिद्र्य धिटाई शिकवते. लगेच सावरून म्हणाली, "दिवाळी कसली? खायाला त्याल द्या..."

"ह्या पणतीत?" दुकानदार म्हणाला.

मुलीने हातातले दहा पैशाचे नाणे टेबलावर ठेवले. "यवड्या पैशात किती बसतं ते द्या - "

"अगं, दहा पैशाचं तेल द्यायला माप कुठलं आणू?"

"पण आमच्याकडे धाच पैशे हाइत्-" पोरीने स्वतःचा 'आमच्याकडे' असा बहुवचनी उल्लेख केलेला पाहून त्या परिस्थितीतही मला मजा वाटली.

"अहो, कमीत कमी किती पैशाचं तेल देऊ शकाल तुम्ही?"

"ऍट लीस्ट फिफ्टीन - " दुकानदार.

त्याला ते सांगताना लाज वाटली असावी. नाहीतर तो इंग्लिश बोलला नसता. आपल्याकडे युटेरस, पाइल्स, सेक्शुअल इंटरकोर्स वगैरे शब्द आपण असेच लाज लपवायला इंग्लिशमधून वापरतो. त्याची आणखी पाच पैशाची सोय केली. पोरीची पणती तरीही पुरती भरली नव्हती. तिच्या घरी पणतीहून अधिक मापाचे 'खायाचे तेल' परवडत नाही.

आता पणतीचे आणि माझे नाते दिवाळीच्या रोषणाईशी होते ते तुटून गेले आहे. पणत्यांची आरास पाहिली, की 'आमच्याकडं धाच पैसे हाइत्" म्हणणारी ती मुलगी - नव्हे, एक प्रचंड आक्रोश मला ऐकू येतो. दिवाळीसारख्याच अनेक गोष्टींची नाती तुटत तुटत मी शून्य होत जातो.

- पु. लं. (एक शून्य मी)