पळा पळा कोण पुढे पळे तो...

हिंदीत लघुकथा हा प्रकार चांगलाच रुजला आहे. या लघुकथा जास्तीत जास्त एका पानाच्या असतात. पण मोठा आशय त्यातून व्यक्त होतो. एके ठिकाणी वाचलेल्या या लघुकथेचा अनुवाद केल्यावाचून राहवले नाही. प्रयत्न केला आहे.

पळा पळा कोण पुढे पळे तो...

ती व्यक्ती जोरजोरात धावत होती. अगदी वाघ मागे लागल्यासारखी. न जाणो थांबलो तर वाघ खाऊन टाकेल की काय असे तिला वाटत होतं की काय देवजाणे. लोकही त्याच्याकडे आश्चर्यानं पहात होते. त्यांच्या चेहर्‍यावरही त्याच्या धावण्याविषयी पडलेले कोडे स्पष्ट दिसत होतं. पण तो असा होता की त्याला या कशाची परवा नव्हती. तो नुसता पळत होता. जग मागे टाकायचंय या आविर्भावात.

शेवटी एकाने त्याला अडवलंच. अर्थात त्यासाठी त्या व्यक्तीलाही पळावं लागलंच. पळता पळताच त्याने त्याच्या पुढे धावणार्‍या त्या व्यक्तीच्या हाताला पकडलं.

'अरे बाबा, एवढ्या वेगाने कुठे पळत चाललाय? तुझ्यामागे कुणी लागलंय की काय? काय झालंय काय?

पळता पळता थांबलेल्या (खरं तर थांबवलेल्या) व्यक्तीने अंमळ नाराजीनेच आपल्याला थांबवणार्‍या व्यक्तीकडे पाहिलं. डोक्याला आलेला घाम पुसत तो म्हणाला, 'जग किती वेगाने पुढे चाललंय बघत नाहीयेस का तू. या स्पर्धेत मला मागे पडायचं नाहीये. मला पुढे जायचंय.' अस म्हणत तो पुन्हा धावण्याची तयारी करू लागला. त्याला अडवणार्‍या व्यक्तीने त्याला पुन्हा रोखलं.
'पण अरे बाब तुमच्या पुढे तर कोणीच दिसत नाहीये.'
'हो, तुमचं म्हणणं खरंय. मी सर्वांच्या पुढे निघून आलोय.' हे सांगताना त्याच्या चेहर्‍यावरचा अभिमान लपत नव्हता.
'पण तुमच्या मागेही कुणी दिसत नाहीये.' त्याला अडविणारी व्यक्ती बोलली.
आता पळणार्‍या व्यक्तीच्या चेहर्‍यावर का कुणास ठाऊक चिंता दाटून आल्यासारखी वाटली. मागे वळून त्यानं पाहिलं आणि मग त्याच्या चेहर्‍यावर आनंदभाव जागृत झाले. त्यात अभिमानाचे धर्मबिंदूही चमकताना दिसत होते.
'अरे बापरे, बाकीचे एवढे मागे राहिले. बिचारे.' असे म्हणत त्याने सुस्कारा सोडला आणि
खिशातला रुमाल काढून कपाळावर जमलेले धर्मबिंदू पुसू लागला.

मूळ लेखक-हसन जमाल