सखी

वाट का शिणली

संथ का चालली

चांदणी चुकली।

कुणी नाही संगे

रातीच्या या रंगे

व्हावे का भुलाया।

अथांग आकाश

विराट रानवा

नको हा चकवा।

स्तब्ध ओठमिठी

मालवली दिठी

तरी उरी भय।

कोण ऐकणार

सप्तकाचा स्वर

तुटेल की तार।

एकांडे जीवन

सरता सरेना

रातही हरेना।

वाऱ्याची झुळूक

सांगून जाई

कानगोष्ट बाई।

तारका हसली

निवळ जळात

सखीला भेटली।