सूर्य

नजर पोचेल तोवेरी विस्तीर्ण माळ पसरला होता. त्यावर उंचसखलपणा दर्शवणारे काहीही नव्हते - एखादा खड्डा, ढेकूळ, खडा वा गवताचे पातेही. पिवळट राखाडी रंगाची अर्ध-मृदू माती त्यावर आपले वेष्टण घालून होती. त्या अखंड माळावर जागृतीचे वा उत्पत्ती-स्थिती-लय या चक्राचे काहीही लक्षण नव्हते.

दणकट, उंच आणि दुहेरी हाडापेराचा तो एका लयीत रपरप पावले टाकत येत होता. दाढेला तंबाकूची चिमूट लावून शेतकऱ्याने हूं-हां-हूं-हां करीत चर खणत न्यावा तसे त्याचे चालणे होते. त्याने पायात चामडी वहाणा घातल्या असतील तर त्यांचा संथ लयीतल्या झोपाळ्यासारखा कर्रकर्र आवाज येत असेल हे सांगायला प्रत्यक्ष त्याच्या जवळ जाण्याची गरज नव्हती.

त्या पठाराच्या अदमासे मध्यभागी आपण पोचलो आहोत असे वाटल्यावर तो थांबला. आव्हान दिल्यासारखे मस्तक उंचावून त्याने समोर बघितले. सूर्य त्याच्या जवळजवळ समोर पूर्ण तेजाने तळपत होता.

"तुला वाटत असेल की तू सर्वशक्तिमान आहेस" त्याचा आवाज खणखणीतपणे उमटला. "तू आमची ऊर्जेची गरज भागवतोस, अन्नाची गरज भागवतोस, आम्ही तुझे आश्रितच आहोत जणू".

सूर्य निर्विकारपणे किरणे फेकीत होता.

"पण मी तुला आव्हान देऊ इच्छितो. तुझ्याकडे चराचराला व्यापून टाकणारी किरणे असतील, तर माझ्याकडे माझे अस्तित्व सिद्ध करणारी माझी सावली आहे. जितका तुझा प्रकाश प्रखर होत जाईल तितकीच ती सावलीही कृष्णमायेने माझी पाठराखण करीत राहील. चराचराला व्यापणारा तुझा प्रकाशोत्सव माझ्या सावलीला तीळमात्र धक्का लावू शकत नाही". सिंहाने आयाळ झटकावी तसा मानेला झटका देऊन त्याने परत सूर्याकडे पाहिले.

सूर्य निर्विकारपणे किरणे फेकीत होता.

मनाजोगती कणीक भरलेल्या पखवाजावर 'धा' उमटावा तसा आवाज झाला आणि त्याच्या बरोबर पाठीमागे दुसरा सूर्य उमटला. हुबेहूब. तितकाच प्रखर, तितकाच निर्विकार.

तो भिरभिरला. त्याची कोरलेली काळी सावली जाऊन त्याजागी दोन सूर्यांच्या साम्राज्याच्या सीमारेषेवर एक अंधुक काळी रेषा उरली होती.

'एक ठिक्क काळी सावली काय, आणि एक करडी रेषा काय, तुझ्या/तुमच्या राक्षसी ताकदीसमोर माझे अस्तित्व अजून आहेच' असे बजावून सांगण्यासाठी तो तोंड उघडणार तोच परत एकदा 'धा' झाले आणि अजून एक सूर्य उमटला.

आता ती अंधुक काळी रेषाही चांगलीच पुसट झाली होती. 'ती तरी आहे' असे बजावण्यासाठी त्याने तोंड उघडण्याआधीच, कसलेल्या पखवाजपटूने ठायलयीत 'धा धा दिं ता' घ्यावे तसे आवाज होत गेले आणि माथ्यावर ताणलेल्या शुभ्र पोकळीत सूर्य उमटत गेले.

आता त्याची सावली फक्त त्याच्या पावलांतळी उरली होती. आणि तीही, पाऊल उचलताच नाहीशी होत होती.

कोपऱ्यात सापडलेल्या मांजरासारखा त्याचा चेहरा हिंस्र झाला. स्वतःचे अस्तित्व पणाला लागले आहे याची त्याला जाणीव झाली.

एकाएकी आडाचौताल स्तब्ध झाला. रांगत्या बाळाने गुंता केलेली लोकर आईने वात्सल्याने गुंडाळावी तशी सूर्यांनी आपापली गुंतलेली किरणे गुंडाळायला सुरुवात केली.

अचानक त्याच्या पावलाखालची जमीन निसटली. दचकून त्याने खाली पाहिले.

नजर पोचेल तोवेरी पसरलेल्या विस्तीर्ण माळावर अदमासे मध्येच उभी राहिलेली, एक ठिपक्यासारखी, आकृती त्याला आव्हान देत होती, "तुला वाटत असेल की तू सर्वशक्तिमान आहेस"...