कोबीचे पराठे

  • मोठा कोबी (ताजा असावा.)
  • चार मध्यम कांदे
  • पोळ्यांसाठी भिजवतो तशी कणीक (घट्ट चालेल.)
  • १ चमचा ओवा, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची (मध्यम ४)
  • मीठ, तेल
३० मिनिटे
सकाळच्या नाश्त्याला... चौघांसाठी

१) कोबी बारीक किसून घ्यावा.

२) कांदे बारीक चिरून चमचाभर तेलात परतून घ्यावेत. त्यातलं पाणी पूर्ण निघून गेल्याची खात्री करून घ्यावी.

३) किसलेल्या कोबीवर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ओवा व परतलेला (गार झालेला ) कांदा घालावा.

४) एका पोळीसाठी लागेल एवढी कणिक घेऊन तिचे दोन भाग करून लहान फ़ुलके (घडी नको) लाटून घ्यावे.

५) ५ छोटे चमचे भरून कोबीचं मिश्रण वेगळं काढून त्यात चवीनुसार मीठ मिसळावे व हे मिश्रण दोनपैकी एका  फुलक्यावर पसरून घ्यावे. त्यावर दुसरा फ़ुलका ठेवून हलक्या हाताने दाबून कडा बंद कराव्यात. थोडे पीठ लावत हलक्या हाताने वरून लाटावे.

६) इतर पराठ्यांसारखे तव्यावर तूप लावून भाजून घ्यावे व वाढावे. 

  • कोबीच्या मिश्रणात आधी मीठ घालू नये. तसे केल्यास त्याला पाणी सुटेल.
  • फ़ुलक्यावर पसरण्याच्या आधीच मीठ घालावे.
  • हिरवी मिरची आवडत असल्यास जास्त घालायला हरकत नाही. आवडत नसल्यास लाल तिखटही वापरता येईल.
  • कच्चा कोबी अतिशय पौष्टीक असतो. तो जास्त खाल्ला जावा यासाठी फ़ुलक्यावर शक्य तितके जास्त मिश्रण पसरावे.
  • अमूल बटरबरोबर हे पराठे झक्कास लागतात.
  • पोटभर आणि पौष्टीक असल्याने 'संडे ब्रंच' म्हणून याचा विचार व्हायला काहीच हरकत नाही.
  • कोबी किसणे, कांदा परतणे आणि स्टफ़ करत बसणे हे सगळे जरा किचकट काम असल्याने खाणारी माणसं ४ पेक्शा जास्त असतील तर हे पराठे करणे जरा वेळखाऊ काम होईल.. 
  • रविवारी सकाळी २ पराठे आणि मस्त एक मोठ्ठा कप भरून फ़ेसाळलेली वाफ़ाळलेली कॉफ़ी !!! अहाहा... अजून काय लिहू??
माझ्या सासुबाई .... मला माहीत असलेला सगळ्यात उत्तम 'कुक'!!