हजारो आशा मनी
जळती माझ्या स्वप्नी
किरणांची चाहूल येथे
मेघ वर्षती लोचनी ।
गर्द तरूंच्या पानी
दव बिंदू ते साचती
घनदाट पसरल्या रानी
सांडती मनातील मोती ।
तेजाच्या मोहक ज्योती
लवलवती दाह प्राशूनी
काजळी न धरे काही
प्रकाश प्रसवे रजनी ।
काफिले अनेक येती
भाव अनाम जागती
उधळिती कधी जपती
मन्मनी अबोध नाती ।
वाट वेडी वळणांची
वळताना मागे पाही
सय कुणा मुसाफिराची
सल दूसरा नाही ।