मदत

शेवटचा पेपर दिला आणि मी आणि मैत्रिणीबरोबर गप्पा मारत पोर्चात उभी होते. तेवढ्यात एक गोड हाक ऐकू आली. आवाजाच्या दिशेने पाहिलं तर दोन अंध मुली मलाच विचारत होत्या, ताई तुमच्याकडे थोडा वेळ आहे? दोघी बिचाऱ्या संकोचून उभ्या होत्या. चेहऱ्यावर केविलवाणा भाव.
का कुणास ठाऊक वाईट वाटलं. पटकन म्हणाले,
हो आहे की. त्यांच्या चेहऱ्यावरचा केविलवाणा भाव आपण मदत करून पुसून टाकू असं वाटलं.
दोघींपैकी एक बोलली.
आम्हाला रस्ता ओलांडून समोरच्या सुधा स्टोअर्समध्ये न्याल? मोबाईल रिचार्ज करायचाय.
हो चला की त्यात काय एवढं. मी त्यांना म्हटलं.
दोघींचा हात मी हातात पकडला. सावधगिरीने रस्ता ओलांडला. आजूबाजूला बरीच गर्दी होती. दोन अंध मुलींना घेऊन रस्ता ओलांडणाऱ्या मला सर्वजण पहात होते. मनातल्या मनात सुखावले. आपल्यात किती संवेदनशीलता आहे नाही?
रस्ता ओलांडल्यानंतरच सुधा स्टोअर्स होतं. दुकानात गेलो. दोघींपैकी एकीनं मोबाईलचा नंबर सांगितला आणि मला दाखवून मगच दुकानदाराला पैसे दिले. मला खूप समाधान वाटलं. पुन्हा एकदा सुखावले. माझ्यावर केवढा विश्वास. मी किती त्यांच्या मदतीला येतेय.
मग मीच त्यांना म्हणाले, बघू मोबाईल. रिचार्ज मेसेज आला का पहाते.
तेवढ्यात त्यातली एक म्हणाली,
नाही ताई. माझा मोबाईल रिचार्ज करायचा नाहीये. हा नंबर माझ्या मैत्रिणीचा आहे. खरं तर तिलाच रिचार्ज करायचंय. पण ती कॉलेजमध्ये आहे ना.
अगं पण ती तरी कॉलेजमध्ये मेसेज कसा पाहील. आपण तिच्याकडे गेल्यानंतरच मेसेज आला की नाही ते कळेल ना? मी माझी शंका मांडली.
नाही ताई, ती आमच्यासारखी नाही. ती पाहू शकते. खरं तर तिच्या पायाला जखम झालीय. चालताना पाय खूप दुखतो. म्हणून मग आम्हीच तिला सांगितलं, की तू बस आम्ही मोबाईल रिचार्ज करून आणतो.
आतापर्यंत मोठा मोठा होत चाललेल्या माझ्या अभिमानाचा फुगा फटकन फुटला. एवढीशी मदत करताना माझ्या मनात उपकाराच्या एवढ्या भावना. आणि त्या....

परतताना त्यांचा हात धरल्यानंतर मला उगाचच वाटत होत, मी त्यांना नव्हे, त्या मला घेऊन रस्ता ओलांडताहेत.

मूळ लेखक-सीमा पांडे `सुशी`