मुखवटे

दिवस गजबजू लागला. गडबडीने अनिकेत बाहेर पडला.

दाराचा आवाज ऐकून शेजारच्या सदनिकेतल्या आज्जी गडबडीने दार उघडून बाहेर आल्या. "जपून जा रे बाळा", त्यांच्या आवाजातून आणि चेहऱ्यावरून प्रेम ओथंबून वाहत होते. अचानक अनिकेतला पिसे लागल्यासारखे झाले. हा प्रेमभरला चेहरा... छे! हा तर मुखवटा. त्या मुखवट्यामागील अगतिक चेहरा त्याला स्वच्छ दिसू लागला. मुलगा बंगळुरात. सून बंगाली. तिने मुलाला पारच बाईलवेडा करून टाकला. 'हे' गेले आणि सुटले ह्यातून. आता माझे काही बरे-वाईट झालेच तर मग हा अनिकेतच देईल बहुधा भडाग्नी. विधीवत मंत्राग्नी कुठला आलाय माझ्या नशिबी? कोंडलेला हुंदकासुद्धा त्याला स्पष्ट ऐकू आला. घाईघाईत पायऱ्या उतरून तो खाली पोचला.

कोपऱ्यावर कोळशानेसुद्धा लाजावे असा काळारोम रामप्पा आपल्या विटलेल्या सोलापुरी चादरीवर पायाच्या खुंटांना ऊन दाखवत बसला होता. ती सोलापुरी चादर ही अनिकेतची देणगी होती. रामप्पाने अगतिक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिले आणि तो ओशाळवाणा हसला. पण अचानक तो अगतिकतेचा मुखवटा बाजूला झाला आणि अनिकेतला आतील संतापाने धगधगणारा विस्तवासारखा चेहरा दिसला. याने स्वतः नसेल, पण याच्याच भाऊबंदांनी कलकलाट करून मला विजापुरातून हाकलून घातले आणि या कोपऱ्यावर आणून आपटले. गौहरबी मुसलमान होती म्हणून? आज ती असती तर... पण जाऊ दे. वेळ आली होती तेव्हा तिच्या राक्षसांसारख्या भावांसमोर शेपूट घातली. कदाचित त्याचीच शिक्षा भोगत असेन. निखारे जरा विझू लागले. अनिकेत उड्या मारतच रस्ता ओलांडू लागला.

फसाफसा उतू चाललेली वाहतूक. वाहनचालक 'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' असे. व्हायचे तेच घडले. गाडी मागे घेताना एका गाडीवाल्याचा एका रिक्षाला धक्का लागला आणि रिक्षाच्या पुढच्या बाजूचा छोटा लाल दिवा फुटला. रागारागाने रिक्षावाल्याने त्या महागड्या गाडीच्या दरवाजावर लाथा घालायला सुरुवात केली. तोंडाने त्या गाडीचालकाच्या आईच्या शरीररचनेतील काही बारकावे विशद करणे चालू झाले. संतापाने तो रिक्षावाला नुसता लालपिवळा झाला होता. पण अचानक तो मुखवटा बाजूला झाला आणि अनिकेतला काही वेगळेच दिसले. भीती. रात्रभर गाडी चालवून जेमतेम साडे-तीनशे रुपये मिळाले. त्यातले शंभर पेट्रोललाच गेले. शंभर नाक्यावरच्या रात्रपाळीच्या हवालदाराने काढून घेतले. मालकाला (रिक्षा ज्याच्या नावावर होती त्याला) शंभर देण्याची बोली होती. आता दिवा फुटला म्हणजे तो उरलेले पन्नासही काढून घेणार. आज वर्षातून एक दिवस तम्माक्का आपल्याला राखी बांधायची म्हणून धंद्यावर बसत नाही. "गंदा लगता है" म्हणते. आता तिला ओवाळणी म्हणून काय घालू? या गाडीवाल्याच्या आयची @#? भीतीने थरथर कापणारा बोकड कसा जीव एकवटून शिंगे रोखून हिंस्त्र धडका मारू शकतो ते अनिकेतला दिसले. डोक्यावर पडलेली घाण झटकावी तसे डोके हलवत तो बाजूला पळाला.

कोपऱ्यावरचा पोलिस या सर्वाकडे निरीच्छ वृत्तीने बघून न बघितल्यासारखे करत होता. एवढ्यात त्याच्यासमोर एक आजोबा अवतरले. "अहो पोलिसराव, आमची विदग्धा अजून आली नाही हो घरी सकाळच्या शिकवणीवरून". "कोन म्हन्ले? च्यामायला अस्लं नाव ठिवल्यावर कोन यील परत?" या पोलिसरावांच्या शेऱ्याला न जुमानता त्यांनी आपली कहाणी उलगडायला सुरुवात केली. भीती त्यांच्या चेहऱ्यावरून निथळत होती. पण अचानक अनिकेतला त्या भीतीच्या मुखवट्यामागचा चेहरा दिसला. त्यावर विशुद्ध प्रेम चमकत होते. मुलगा अमेरिकेत. त्याचा घटस्फोट झालेला. दुसऱ्या संसारात अडथळा नको म्हणून हिला आपल्याकडे आणून ठेवलेली. माझी चिंकुली ती! किती खोड्या करते! एक चांगला गालगुच्चाच घ्यायला हवा कारटीचा! अनिकेत दचकून पुढे झाला.

आपला भ्रमणध्वनी हा ध्वनीवर्धक आहे अशा समजुतीत एका इसमाचे कोपऱ्यावरच्या महा-बाजाराच्या विस्तीर्ण पायऱ्यांवर संभाषण चालू होते. "नो डार्लिंग... आय केअर फॉर यू, ऑफ कोर्स आय वरी अबाउट यू... आर यू ओके? आय विल बी विथ यू इन अ जिफ्फी.." अगदी 'प्रेमचि चटणी प्रेमची भाकर' चालले होते. पण अचानक मुखवटा बाजूला झाला आणि आतला लोभी डोळ्यांचा लालचावलेला चेहरा त्याला घाबरवून गेला. साली कुतिया. शरीफ माणसाच्या घरात ठेवायची औकात नाही. दिवसभर स्कॉच ढोसत पत्ते कुटत असते. ब्रिगेडियर कोहलीची एकुलती एक मुलगी म्हणून इतकी मस्काबाजी करतोय. म्हाताऱ्याने लोणावळ्याला पाच एकर जमीन दाबून ठेवली आहे ना. एकदा का त्याची पॉवर ऑफ ऍटर्नी मिळाली की मग तुला कल्याणी देशपांडेकडेच पोचवतो...

अनिकेतला गरगरल्यासारखे झाले. काय करावे ते न सुचल्याने तो परत घरी पळाला.

दारामागच्या आरशात डोकावून पहाताच तो भेदरला.

'मुखवट्यांमागचे चेहरे पाहणाऱ्या'चा मुखवटा त्याला स्वतःच्या चेहऱ्यावर लख्ख दिसला.