विषवल्लीची मुळं

कामावरून परतल्यानंतर मी जेवायलाच बसलो होतो. तेवढ्याच डॉलीने आठवा सूर लावला.
``ओ रे बाळा ओ. काय झालं. कुणी मारलं का माझ्या बाळाला? मी तिला गोंजारत विचारलं.``
``बाबा, मला स्कूटर पायजे.`` हुंदके देत डॉली म्हणाली.

``अगं, पण तुझ्याकडे तर भरपूर खेळणी आहेत. मग आता स्कूटर कशाला?

हे म्हणताच, ती आणखी जोरजोरात हुंदके द्यायला लागली. हुंदके देता देताच म्हणाली,

``बाबा, माझ्या भावलीला वाचवा.``

``काय झालंय तुझ्या बाहुलीला.``

मी प्रेमानं विचारलं.

``शेजारच्या पिंकीने तिच्या भावल्यासोबत माझ्या भावलीचं लग्न लावलं आणि माझी भावली घेऊन गेली.``

 हे सांगितल्यानंतर तर डॉलीला रडू आवरेना.
हुंदके देता देताच ती म्हणाली,

``आता पिंकी म्हणतेय, हुंड्यात मला स्कूटर दे नाही तर भावलीला जाळून टाकेन. बाबा, आपल्या भावलीला वाचवा ना. मला स्कूटर घेऊन द्या ना. ``

डॉलीचे हुंदके वाढत गेले. तिच्या हुंदक्यात हरवलेले तिचे शब्द माझ्या कानावर सारखे आदळू लागले. मी सुन्न झालो.
 
मूळ लेखक- बलराम अग्रवाल