एक मनुष्य होता. त्याचा स्वतःचा एक छोटासा व्यवसाय होता. घर, संसार, व्यवसाय या सर्व आघाड्यांवर लढताना त्याची खूपच तारांबळ उडत असे. रोज रात्री झोपताना तो देवाजवळ प्रार्थना करायचा, "देवा मला अशा जागी घेऊन चल की जेथे व्याप-ताप, काळज्या काहीही नसेल. मी जी इच्छा मनात आणेन ती पूर्ण होईल".
.....आणि खरोखरच एक दिवस देव त्याच्या स्वप्नात आला आणि म्हणाला, "तुझ्या सगळ्या मनोकामना मी पूर्ण करेन. फक्त मी सांगतो तसं कर. अमुक दिशेने प्रवास करायला सुरुवात कर. काही दिवस प्रवास केल्यानंतर तुला एक मोठ्ठं शहर लागेल. त्या शहराच्या पुढे एक मोठ्ठं वाळवंट आहे, ते पार केल्यानंतर तू माझ्या शहरात येऊन पोहोचशील. तुझ्या सगळ्या काळज्या मी दूर करेन, तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करीन. पण एक गोष्ट नीट लक्षात ठेव, वाळवंटाअलिकडच्या शहरातले लोक तुला माझ्या शहरात यायचे अनेक जवळचे मार्ग सांगतील. जर तू त्या मार्गाने आलास तर जेमतेम माझ्या शहराच्या वेशीपर्यंत पोहोचू शकशील. आणि कालांतराने तुझी तिथून हकालपट्टी होईल. मग तुझी अवस्था सध्यापेक्षाही वाईट होईल. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुझं तूच काय करायचं ते ठरव." इतकं बोलून देव अदृश्य झाला.
दुसऱ्या दिवशी त्याने बायको-मुलांना आदल्या रात्री स्वप्नात पाहिलेला सर्व वृत्तांत सांगितला व आपण त्या देवाच्या शहराचा शोध घ्यायला जाणार असल्याचा मनोदय जाहीर केला. घरच्यांनी त्याला पूर्णपणे विरोध केला. कोणालाही त्याने आपला सुखाचा जीव दुःखात व धोक्यात घालावा अशी इच्छा नव्हती. उलट बायकोने त्याला आहोत त्यात अजून काटकसर करण्याचे व स्वतःच्या हौशी-मौजी थोड्या कमी करण्याचे वचन दिले.
हे सगळं ऐकल्यावर त्याचा देवाच्या शहरात जायचा निश्चय थोडासा उणावला. तरीही आतून कुठेतरी वाटत होतं की देव माझ्याशी खोटं बोलणार नाही. त्याने मला मार्ग व्यवस्थित सांगितलाय. धोक्याच्या जागाही दाखवलेल्या आहेत. मग जाऊन बघायला काय हरकत आहे?
होय-नाही करता करता एक दिवस त्याने त्या देवाच्या शहरात जायचं मनाशी पक्कं केलं. बाकी कोणालाही बरोबर न घेता तो निघाला. निघताना कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करून थोडीफार पुंजी त्याने वाटखर्चासाठी बरोबर घेतली.
जेव्हा तो त्या वाळवंटाअलिकडच्या शहरात आला, तेव्हा त्याच्याजवळ फारच थोडी पुंजी शिल्लक होती. देवानं सांगितल्याप्रमाणे तिथे त्याला जवळचा मार्ग सांगणारे, इतकेच नव्हे, देवाच्या शहराच्या वेशीजवळ नेऊन सोडतो असे सांगणारेही अनेक जण भेटले. पण त्या कोणाचेही न ऐकता त्याने वाळवंटातून चालत जायचे ठरवले. वाळवंटातून चालताना त्याला अनेक वादळांचा सामना करावा लागला. कित्येकदा त्याला भुलवण्यासाठी त्याची दिशाभूल करण्यासाठी वाटेत अनेकजण आडवे येत. पण त्याचबरोबर त्याच्यासारखेच ठराविक ध्येयाने प्रेरित होऊन त्या शहराकडे वाटचाल करणारे काही समविचारी लोक त्याला भेटले. अधिक चौकशी केली असता त्यांनाही देवाने स्वप्नात येऊन दर्शन दिले होते. त्याच्याप्रमाणेच त्यांच्याही सगळ्या मनोकामना देव तिथे आल्यावर पूर्ण करणार होता.
अशाप्रकारे एकमेकांशी गप्पा मारत पुढे वाटचाल करता करता देवाच्या शहराची वेस आता दृष्टीच्या टप्प्यात आली. सारा मिळून हा प्रवास फक्त एक-दोन दिवसांचा उरला असेल. इतक्यात एक मोठं वादळ झालं आणि सगळ्या दिशा आंधळ्या करून ह्या सर्वांना भलत्याच दिशेकडे ढकलत घेऊन जायला लागलं. मग ह्या लोकांनी ठरवलं की आपण एकमेकांचे हात घट्ट पकडून हे वादळ शमेपर्यंत आहे तिथेच उभं रहायचं.
कालांतराने वादळ शमलं. पण समोर पाहिलं तर देवाच्या शहराची वेस अदृश्य झाली होती. सभोवार नजर टाकली तर कोणत्याही दिशेला देवाच्या शहराचा मागमूस दिसत नव्हता. पण सुदैवाने त्यांच्यातल्या एकाला अशा प्रकारच्या वादळांचा थोडाफार अनुभव होता आणि अशा वादळातून नंतर योग्य वाट कशी काढायची ह्याचीही थोडीफार माहिती होती. त्याने रात्रीच्या अंधारात ग्रह, तारे, चंद्र, ध्रुव वगैरेवरून एक दिशा ठरवली व दिवसाच्या सूर्याच्या उगवती-मावळतीवरून ती पक्की केली. आणि सर्वांनी त्या दिशेने चालायला सुरुवात केली.
अखेर दोन-तीन दिवसांनी ते देवाच्या शहराच्या वेशीपाशी येऊन पोहोचले आणि आपण आल्याची खबर द्वारपालाजवळ दिली. त्यांच्या अंगावरचे कपडे जरी मळके, फाटके दिसत असले तरी आता त्यांच्या चेहऱ्यावर, शरीरावर एक विलक्षण तेज चमकत होते. त्यांची खबर देण्यासाठी द्वारपाल धावतच देवाकडे गेला. आत प्रवेश मिळण्यापूर्वी ही मंडळी तिथेच जराशी विसावली आणि आपण चालत आलो त्या मार्गाकडे बघताना त्यांना असं जाणवलं की त्यांची दृष्टीसुद्धा आता पूर्वीपेक्षा अधिक तीक्ष्ण, दूरवरचे बघू शकणारी अशी झालेली आहे. ज्या मार्गाने आपण चालत आलो, त्या मार्गाने बरेच लोक चालून येताहेत. काहीजण वाटेतच खचून, नाउमेद होऊन कोसळून पडताहेत. फक्त थोडेसेच लोक ह्या मार्गावर पुढे पुढे वाट काढत, सर्व अडथळ्यांचा सामना करत येताना दिसताहेत. जे कोणी जवळच्या मार्गाचा वापर करताहेत ते देवाच्या शहराच्या वेशीचा दरवाजा दिसेल इतक्या अंतरापर्यंत पोहोचताहेत आणि तिथे आल्यावर तयार होणऱ्या वादळात भरकटत जाऊन भलतीकडेच फेकले जाताहेत.
इतक्यात द्वारपालाने स्वतः देवच त्यांच्या स्वागताला आल्याची बातमी त्यांना दिली. सर्वजण वेशीतून आत शिरले. प्रत्यक्ष देव त्यांच्या स्वागताला उभा होता. पण त्या देवाच्या चेहऱ्याकडे लक्ष जाताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण प्रत्येक जणाला देव हुबेहूब स्वतःसारखाच दिसत होता.
टीप: ही कथा माझ्या धाकट्या भावाने लिहिलेली आहे. आंतरजाल त्याच्या वहिवाटीत नसल्याने त्याने ही माझ्याकडे दिली. मी केवळ टंकलेखनाचे काम केले आहे, कुठेही काहीही बदल केला नाही. प्रतिक्रिया आल्यास त्याला वाचून दाखवीन.