विक्रमादित्याची दिनचर्या

                                                       

विक्रमादित्याला आज पहाटे पांच वाजताच जाग आली. पूर्वी यावेळेस तो फिरायला जायचा. प्रकृतीच्या कारणास्तव डॉक्टरांनीच त्याला तसे बजावले होते. सकाळी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्याचा फायदा त्याच्या तब्येतीला तर झालाच, शिवाय सकाळी कोणकोण मोठे लोक भेटले आणि मी त्यांनाही कसे सुनावले याच्या कथाही मित्रांना सांगता यायच्या. पण त्याचाही आताशा कंटाळा येऊ लागला होता. डॉक्टरला काय कळतंय, त्याने तर आपल्याला सिगरेट ओढायलाही बंदी घातलीये, असा विचार करून पडल्या पडल्याच विक्रमादित्याने एक सिगारेट शिलगावली. आज कारखान्यांत कोणाला बोलून झोडायचे, कोणाचा पाणउतारा करायचा याचा विचार करता करता दोन सिगरेटी संपल्या देखील!
           मग झटक्यात उठून त्याने सगळी आन्हिके उरकली. बायकामुलांवर ताशेरे झाडतच तो तयार झाला. स्टेशनवर जायला लवकर रिक्शा न मिळाल्याचा राग कोणावर काढावा या विचारात आणखी एक सिगरेट चुरगाळली. प्रवासात त्याचा नेहमीचा ग्रुप होताच, त्यांतच तोंडी लावायला एक नवीन पाहुणाही होता. पाहुण्याच्या दुर्दैवाने तो मराठी होता! गाडी सुरू होताच विक्रमादित्याने आपली पोतडी सोडली. आधी मराठी माणसाच्या नाकर्तेपणाबद्दल फैरी झाडल्या. मग आपल्या सोन्यासारख्या देशाची कशी वाट लागली आणि त्याला तुम्हीच सगळे (मी सोडून) कसे जबाबदार आहात हे प्रभावीपणे पटवून दिले. त्यानंतर अमेरिकेचे गुणगान करून सर्व मोठ्ठ्या हस्तींशी माझी कशी ओळख आहे हे बोलण्याच्या ओघात पाव्हण्याला खुबीने सांगितले. बिचाऱ्या पाहुण्याचा वासलेला आ बंदच होत नव्हता. नेहमीच्या ग्रुपला मात्र अजीर्ण झाले होते. त्यांना आतापर्यंत सगळेच डायलॉग तोंडपाठ झाले होते. पाहुण्याला अजून जरा घोळात घ्यावे या धूर्त हेतूने,  त्याने दुपारच्या जेवणाचे आमंत्रण दिले.  
         कारखान्यात पाऊल टाकताक्षणी विक्रमादित्याच्या जणु अंगात संचारले! सलामीला दाराशीच गुरख्याला कडक सलाम कसा ठोकायचा ते सुनावले. सुपरवायझर व अन्य दोनतीन कर्मचाऱ्यांना स्वच्छता न राखल्याबद्दल यथेच्छ शिवीगाळ केली. नंतर एकदोघांना फोन करण्याचा प्रयत्न केला. फोनचे यंत्र नीट चालत नसल्याचा संशय आल्याबरोबर फोनच उचकटून कोपऱ्यात भिरकावला आणि पार्टनरवर  जोरात ओरडून एक नवीन फोन आणण्याचे फर्मान सोडले! भेटायला एकदोन ठेकेदार व सप्लायर्स आले होते. त्यांना इतक्या लवकर पैसे मागितल्याबद्दल गुरकावले. अत्यंत अपराधी मुद्रेने ते बिचारे खाली मान घालून चालते झाले. हे सर्व चालू असताना चहापानाचा व धुम्रपानाचा यज्ञ अखंडपणे चाललाच होता. लवकरच विक्रमादित्य कंटाळला. दर पांच मिनिटांनी नवीन काही घडले वा बिघडले नाही की तो असाच कंटाळत असे.
        मग त्याने कारखान्यात एक फेरी मारली. विक्रमादित्याच्या कल्पनेची भरारी फार मोठी होती. आजवरचे यश केवळ त्याच्याच सुपीक 'किडनीतून' (त्याचा आवडता शब्द) बाहेर पडलेल्या अफाट कल्पनांमुळे मिळाले होते. रूढ प्रथेपेक्षा अनेक वेगळी व  नवीन यंत्रे स्वतःच्या डोक्याने बनवून घ्यायची आणि ती चालवून बघायची हा त्याचा आवडता छंद होता. ती चालली तर ठीक नाहीतर त्याची जागा अडगळीत! आज असेच एखादे नवीन यंत्र आणून कुठे ठेवावे या विचारांत असताना त्याला एकदम जाणवले की आता नवीन काही ठेवायला कारखान्यात जागाच नाही! त्यासाठी ताबडतोब एक नवीन कारखाना काढण्याचे नक्की झाले. विक्रमादित्य खुश हुआ! कारण आता निदान सहा महिने तरी त्याच्या किडनीला भरपूर काम मिळणार होते. नवीन जागी प्रायोगिक यंत्रांसाठी खूप जागा ठेवायची. पुन्हा एकदा सगळ्यांना आपल्या बुद्धीची चमक दाखवायची!! पैसे काय कोणीही भxx कमावतात. पण सतत काही नवीन करायला अक्कल लागते. आणि ती तर दुसऱ्या कोणाकडेच नाही.
       दुपार झाली. पाहुणा जेवायला आला. त्याला नोकरी सोडून व्यवसाय करणे हेच कसे पुरूषार्थाचे लक्षण आहे हे पटवून देण्यात आले. कारखाना आपल्या गतीने चालूच होता. पाहुण्याला सर्व यंत्रे व संयंत्रे दाखवून संमोहित अवस्थेत पाठवून देण्यात आले.
      संध्याकाळ झाली. विक्रमादत्य आता फार दमला होता. शरीर थकले होते डोळ्यांवर झापड येत होती. परत जायची वेळ होऊन गेल्यामुळे इतरांची चुळबुळ सुरू झाली. पण आत्ताच आपण निघालो तर इतरांना वेळेवर घरी जाण्याची चटक लागेल या भीतिने विक्रमादित्याने चर्चेचे गुऱ्हाळ चालू केले. अगदीच नाईलाज झाल्यावर त्याने आपली धोकटी उचलून स्टेशनचा रस्ता धरला.
       रात्री घरी पोचला तोपर्यंत सर्वजण जेवून टी.व्ही. पहात होते. कसेबसे जेवून घेतल्यावर तो शयनगृहात गेला. सगळे अंगांग दुखत बिछान्यावर पहुडलेला तो पुरुषसिंह फार उदास होता. पण थकूनभागून कसे चालले असते ? उद्या सकाळी उठून परत धांवायचे होते. वेळ कमी होता. कारण या जन्मातही विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नव्हता !!!