पद्म

यापूर्वी दि. बा. मोकाशींच्या 'आता आमोद सुनासि आले' या कथेसंबंधी लिहिले होते. गुणवत्ता असूनही प्रसिद्धीचे, लोकप्रियतेचे जेवढे पडायला हवे तेवढे माप, दुर्दैवाने पदरात न पडलेले मोकाशींप्रमाणेच श्री. दा. पानवलकर हेही एक समर्थ कथालेखक. विजय तेंडुलकरांनी लिहिलेल्या अर्धसत्य या चित्रपटाची पटकथा ज्या 'सूर्य' या कथेवर बेतली आहे; तिचेच नाव पानवलकरांच्या एका कथासंग्रहाला दिले आहे. त्यातील 'पद्म' ही कथा नुकतीच वाचनात आली. वर उल्लेख केलेल्या मोकाशींच्या कथेच्याच तोलामोलाची. छोटेखानी असल्याने ती पूर्ण स्वरुपात येथे देत आहे. हाच लेख येथेही वाचता येईल.

...

चिंचेचा मोहर तोंडात टाकावा तशी सकाळची उन्हं खात दोन सायकली गावाबाहेरच्या सडकेला लागल्या. लिंबाची थंडगार झुळूक पाठीवर उतरत होती. वडाची सळसळ सडकेचं वळण दाखवू लागली. गाईम्हशींच्या खुरांनी काढलेली धुळाक्षरं न पुसता वाट काढावी लागली. खांद्यावरच्या काठीवर हात सलाम टाकून गुराखी सडकेकडेला वाकडा उभा होता. आणि उभ्याउभी गळा तापवत होता.

उंटाच्या कातड्यासारखा माळ बाजूला टाकत असताना चढण लागली. छाती हँडलला लावून पाय रेटत होतो. तेव्हा निळे डोंगर ओळख असल्यासारखे एकाएक पिंगट दिसू लागले.

पायात पेटके येऊ लागले. रपेट रिकामी वाटू लागली.

चढण संपली. टेकडावर सायकलींनी जरा थांबल्यासारखा दम टाकला. नजरेच्या कडांना शेवाळी आकाशाचा तुकडा हेलकावे देऊ लागला. पुन: पायडल मारले. पुलावरचा सरळ रस्ता ढिला पडला. कानामागून घामाचे दोन मणी सुटून मानेवर सरकत गळ्यावर उतरले. रुमाल काढून टिपताना डोळ्याखालची ओलसर छटा पुसावी लागली. हलकी झुळूक केसाच्या मुळापर्यंत गारवा देऊन गेली. संथ वाऱ्याबरोबर रस्त्याकडेच्या बांधावरच्या झुडुपांत गोजिरवाण्या झोपड्या डोकावू लागल्या.

उतरणीला सायकली वारा प्यायल्यासारख्या सुटल्या. भिरीरी कान घुमले. डोक्यावर जटा उभ्या राहिल्या. नजर झोपड्यांवरून सरकत असताना नक्षीदार एरंडाचं झुडुप झोपेतून  उठल्यासारखं दिसू लागलं.

उतार संपून वेग ओसरला. झुडुपाला भांग पडला. नुकत्याच व्यालेल्या केळीसारखी एक बाई उगवली. न न्हाताधुता ती ओलीओली वाटत होती. तिची नजर ओल्या हळकुंडासारखी, चाहूल घेत सैरभैर फिरत होती.

कानाडोळा करुन सायकली पुढे गेल्या.

भोवतालच्या पिंगट डोंगरांनी जुळवत आणलेल्या द्रोणात गावाची आठवण पार बुडवून टाकली. उजव्या बाजूला मेंढरांनी खडी काढलेला माळ चमकू लागला. सावल्या धरून सायकली निघाल्या, आणि डाव्या अंगाला नजर स्थिरावू लागली.

शेवाळी आकाश संथ हेलकावत होतं.

सडकेला अर्धवर्तुळ काढून उतरलो. सायकली झाडाला लावल्या आणि वडाची सावली तुडवत समोर पाहू लागलो.

शेवाळाचा एक पदर डोंगराच्या पायथ्यापर्यंत पसरत कातळावर दुमडलेला दिसत होता. अधूनमधून चमकणाऱ्या आरस्पानी तुकड्यावर, पसरलेल्या ओंजळीसारखी पानं झुळकीसरशी लवथवत होती. झुळूक फिरली की पानामागची शुभ्र कमळं आणि बोट सुटून जरा मागं पडलेल्या कळ्या जागच्या जागी थरथरत राहात. उन्हात तिरीप उतरत राहिली तशा लाटा चमकू लागल्या. पानाफुलांना धक्के देत शेवाळाचा लागाबंधा तोडून काठावरच्या सावलीत रेंगाळू लागल्या. मागं सुटलेला शेवाळाचा पदर तसाच तरंगत पडला. पुन: एक उलटा झोका. लाट फिरली. शेवाळाला पैलतीराच्या कातळापर्यंत पोचवून परत आलेला झोका कमळांच्या नाळी धुंडत डोहाडोहांत उतरू लागला -- गूढाच्या शोधात. डोळ्यांच्या कवड्यांना काळाभोर गारवा लागला.

पावलं फरसबंदी पायऱ्यांकडं वळली. शेवटच्या पायरीच्या एका बाजूला बूढ्ढा गळ टाकून बसला होता. डुलकी लागली होती त्याला. दाढीवरचं बीळ हवा खात होतं. गळाच्या काठीवरचा शिरांनी गाळाठलेला हात मात्र जागा. काठीचा बाक सावली धरुन तरंगत होता.

चुबक्कन लाट फुटली. दीर्घ वेलांटीची चमक हवेत उमटली. काठीचा हात उंच झाला. गळाची मासळी फरशीवर तडफडू लागली. "याऽमेरे मालिक." बूढ्ढा पुटपुटला. त्याच्या हाताच्या पंजातून सुटलेली मासळी पुन: तडफडली. मग वळवळत राहिली. तिला त्यानं जरा हवा खाऊ दिली. वळवळ थांबल्यावर बुढ्ढ्यानं मासळी बाजूच्या टोपलीत टाकली. गिळगिळीत वासानं नाकपुड्या हलल्या.

"क्यों बुढ्ढेमियाँ?"

डोळ्यांवर हाताचा पंजा धरून त्यानं वळून पाहिलं. "दो घंटे बैठा हूं." आणि तो आपल्या करड्या दाढीएवढं थोडं थोडं हसला.

त्यानं मग टोपलीतल्या ओल्या फडक्यातली लिवलिवीत गोळी घेतली. गळाच्या हुकात ओवली. काठी सरसावून गळ लांबपर्यंत भिरकावला. चपकन शेवाळ फुटलं. लाट उमटली. आणि जवळच्या कळीमागून कमळाला ओलांडून पानाआड झाली.

खोल पाणी दिसलं की खडा टाकावासा वाटतो. दोस्तानं चारपाच खडे घेऊन सुरवात केली. टपक...टपक. हलक्या लाटांवर शुभ्र कमळं आणि कळ्या डुलू लागल्या. एखादा खडा फुलाची पाकळी छिलून जायचा. एखादा कळीच्या वाटेला जायचा. एकदोन खडे घेऊन मीही इकडेतिकडे फेकले. एक खडा चुकून एका गुटगुटीत कळीवर बसला. बाजूचं शेवाळाचं चिरगूट डगडगलं. गळ टाकून बसलेल्या बुढ्ढ्याची डुलकी फुटली तेव्हा आमचे हात थांबले.

बुढ्ढ्यानं काठी उचलून पाहिलं. गळ हलका लागला. त्यानं पुन: गळ फेकला. तो शेवाळाखालच्या पाण्यात संथपणे उतरत राहिला.

काम असल्यासारखं डोंगराआडून झुळूक आली. झर्रकन सर्वभर हेलकावा देऊन गेली. कमळांचं रान थरथरलं.

अच्छोदसरोवरातली श्वेतपद्मं पाहात असल्यासारखा माझा दोस्त शेवटच्या पायरीवर निमूट बसून होता.

"मित्रा, आल्यासारखं दोनचार कमळं तरी तोडून घेऊ."

त्यानं नुसतंच "हूं" म्हटलं आणि एक खडा टाकला.

चित्रासारखा बसलेला बुढ्ढा आपोआप पुटपुटला, "झील फैला है. पाव फिसल जायगा."

पाणी शेवाळानं सारवल्यासारखं हिरवं गारेगार बुळबुळीत होतं. कमळांचा संसार आनंदानं सर्वभर फुलला होता. टवटवीत झालेली नजर फुलपाखरासारखी इथंतिथं बसत असताना पायरीचा कोपरा चढून गोगलगाय येऊ लागली --- चकचकीत लाळ ओढत. पाठीवरचा शंख घेऊन ती तशीच तिरकी पायरीच्या खाचेत उतरली.

तिकडं समोरच्या डोंगराचा नंदीबैल निवांत बसला होता. त्याला पिढ्यान्-पिढ्या पुरून उरेल एवढा हिरवागार घास पायथ्याशी पसरला होता. तोच घास डाव्याउजव्या अंगाला फोफावून वाऱ्याची दिशा दाखवत होता. नजर भिरभिरत असताना रिकाम्या हातानं एकदोन खडे फेकले.

बुढ्ढ्यानं पापण्या उघडल्या. गळ खेचला. पाण्यावर चमक उडाली. आणि गळासकट मासोळीनं कोलांटी घेतली. फरशीवरची तडफड टोपलीत गडप झाली.

"या मेरे मालिक."

अंगावरच्या मातकट कुडत्यात बुढ्ढा सुट्या पानासारखा थरथरत होता. बसूनबसून त्याला शेवाळ आलं होतं.

"बुढ्ढेमियां, दोन फुलं घेऊ का तोडून?"

पाठीचं पोक सफई करून बुढ्ढ्यानं डोळ्यावर हात घेत सांगितलं, "खतरनाक है...उस छोकरे को बोलो."

त्यानं पुन: गळ टाकला.

खडकातून उगवल्यासारखं एक पोरगं काठावर खेकड्यासारखं फिरत होतं. हटकल्याबरोबर ते पुढं आलं आणि तोंड विचकून बघाय लागलं.

"चार कमळं आण तोडून. पैसे देतो तुला."

पोराचा चेहरा रुंद झाला. "कपडे वाळत टाकून येतो" म्हणालं.

दोस्तानं एक तर एकच घेतलं. आता त्यानं खडे मारण्यात नेम धरला होता. एक डोळा बारीक करून त्यानं खडा फेकला. नेमका चुकला. तो त्या चुकार कळीकडं पाहू लागला. मग मीही खडा उचलला. पवित्रा घेतला. टिचून फेकला. तो चपकन लागला. पिकलेल्या करटावर बसल्यागत झालं. कळ चमकली.

"ए, तिकडं बघ." पायरीवरचा दोस्त एकदम म्हणाला.

"मेलेला मासा फुगून वर आलाय." मी हसून म्हटलं. नाकपुड्या जरा हलल्या. पण पाहात राहिलो. शेवाळ फुगा धरून तरंगू लागलं. बाजूची दोन कमळं टकाटका बघत होती. गळाची काठी सावली धरून पाण्यावर थरथरली.

तोपर्यंत लंगोटीचा शेव करकचून पोरगं पुढं आलं. त्याला मी हवी ती दोनचार फुलं दाखवली.

फुलांना जाग न येईल या बेतानं त्या बेट्यानं बिनआवाजाचा सुळका घेतला. कासवागत फिरून ते नेमकं कमळाजवळ उगवलं. नाळीसकट त्यानं दोन कमळं तोडली. आणि तसंच तरंगत पायरीकडं आलं. शेवाळाचा सद्रा घालून. फुलं देऊन त्यानं पुन: सुळका मारला.

हातातल्या शुभ्र कमळांच्या नाळी सापासारख्या फरशीवर लोंबत होत्या. डवरलेल्या पाकळ्यांमध्ये ओला कंद लसलसत होता. फुंकर घातली तसा वासनेच्या ठिणगीसारखा निळाभोर किडा तुडतुडला आणि मनात नसताना मधाचा कण सोडून पुन: पाण्याकडं दिसेनासा झाला.

पोरगं आणखी दोन कमळांमध्ये डोकं काढून थांबलं. नाळीला हिसका देऊन त्यानं कमळं तोडून घेतली. डोह खळबळला. लाटा फुटल्या. फुगा धरून राहिलेल्या शेवाळाचं चिरगूट सुटून बाजूला तरंगलं. त्यात गुरफटलेली कळी उघडी पडली. एक गुबगुबीत कोवळं पाऊल डगमगलं. ते गोल फिरलं. कोवळ्या द्राक्षासारखी पाच बोटं नजरेला चाटून गेली. आलेला झोका पाऊलवाटेनं काळ्याभोर गारव्यात उतरला नाळ धुंडत.

फुटलेली लाट पायरीपर्यंत आली. पाण्यात पाय सोडून बसलेला भिडू तटकन उठून उभा राहिला. तसाच वर आला. "काहीतरी आहे" म्हणाला आणि आपल्या सायकलकडं गेला.

नकळत मी बुढ्ढ्याकडं पाहिलं. त्याला कळीदार डुलकी लागली होती.

पोरानं पुढं केलेली कमळं घेतली. त्याला पैसे दिले आणि सायकलकडं गेलो. मागं वळून पाहावंसं वाटत होतं, पण पाहिलं नाही.

सडकेवर नेम धरून भिडू गरागरा सायकल मारत होता.

रस्ता तुटत होता. झोपड्या दिसू लागल्या. एरंडाचं झुडूप आलं. मघाची व्यालेली केळ पुन: दिसली.

सायकल पुढं गेली तरी तिची नजर गोगलगाईसारखी चकचकीत लाळ उमटवीत होती. भिडूनं तोवर पार पल्ला गाठला होता.

....

जेमतेम पाच पानांची ही कथा. पहिल्यांदा वाचली तेव्हा जी.एं. च्या विलक्षण उपमांची आठवण करुन देणाऱ्या लेखनात आणि चित्रदर्शी वर्णनातच एवढं गुंतायला झालं, की शेवटच्या कलाटणीचे संदर्भ लक्षात यायला जरा वेळ लागला. पुन्हा एकदा कथा वाचली आणि मग त्यातली नुकतीच व्यालेल्या केळेची उपमा; मित्राच्या सायकलीने केलेला कानाडोळा; गावाची आठवण बुडवून टाकण्याचा प्रयत्न करणारे डोंगर; (वयस्क) शेवाळाला पैलतीरी पोचवून कमळांच्या नाळी धुंडाळायला येणारा तो 'उलटा' झोका; परमेश्वराला साद घालत त्याच्यासारखाच 'तट'-स्थ बसलेला बूढ्ढा आणि तसाच निवांत निरीक्षण करणारा डोंगरावरचा नंदीबैल; पाठीवर शंख घेऊन लाळ खुरडत फिरणारी गोगलगाय; 'खोल पाणी दिसलं की खडा टाकावासा वाटतो' हे अगदी सहज येणारे वाक्य; धोक्याच्या जागी असलेली पण दाम मोजून सहज खुडता येणारी कमळं; फसवं 'फैला हुआ' झील, त्यातली चुकार कळी आणि निरुपायाने मधाचा कण सोडून परतावं लागणारा  निळा किडा यांचं रुपक; सुरुवातीच्या प्रसन्न (चिंचेचा मोहर खावा तशी उन्हे खात) उपमांनंतर कथेच्या अखेरीस, कलाटणीच्या अगदी आधी येणाऱ्या अभद्रसूचक उपमा (सापासारख्या लोंबणाऱ्या नाळी, वासनेच्या ठिणगीसारखा किडा) -- या साऱ्या गोष्टींचा मग संदर्भ लागला. वाचून अंगावर काटा यावा पण कौशल्याला दाद द्यावी असे सारे एकत्र गुंफलेले.

उत्तम कथा लिहायला प्रतिभा सर्वात महत्त्वाची असली, तरी लेखनाच्या तंत्राकडेही लक्ष पुरवावे लागते. या दोन्ही गोष्टींचा इतका उत्तम मेळ, इतका सुरेख परिणाम आणि तोही कमी शब्दांत क्वचितच इतर कुठल्या कथेत साधला गेला असेल.