देव नाही भेटला...

गाभाऱ्यात साचती, फुल पत्रीच्या माळा
दर्शनास थांबती सारे, घेउनी मनोकामना ।

संसाराचे भोग किती, लागले सदा मागे
म्हणूनी देवा आता, तुम्हीच आम्हा सांभाळावे ।

नोकरी धंद्याचा व्याप हा, जीव त्यात गुंतला
म्हणूनी पूसती असे का, जवळचा मार्ग इथला।

एकेक पैसा जोडण्यास, केले किती प्रयास
राखण्यास सर्कारी 'करां' पासूनी, पडती सायास ।

बाजारभाव पुण्याचा, विचारती पुजाऱ्यास
काळ्या बाजारी पडेल का,थोडे पुण्य पदरात ।

टाकती नाणी जपूनी, दान पेटी मध्ये
हिशेब त्या नाण्यांचा, वाचती ईश्वरा पुढे ।

दर्शनाने धन्य होती, मूर्ती पुढे टेकती माथा
बाहेर येउनी बोलती, 'आत' देव नाही भेटला ।