संध्याकाळी सात वाजता पाटणा स्टेशन आले. आम्ही पाय मोकळे करायला स्टेशनवर उतरलो. खूप मोठे स्टेशन. सुंदर प्रशस्त आणि स्वच्छ. बिहारची जी प्रतिमा उभी असते तिच्याशी विसंगत. अर्थात रेल्वे मंत्र्याच्या गावचे स्टेशन म्हणूनही असेल. पण स्टेशन मला खरेच आवडले.
सुरभीचं गाव जे दुपारी दीड दोनला येणार होतं ते आता रात्री एकला येणार होतं. तिचे तर सारखे दर स्टेशनला वडिलांना फोन जात होते. आता इथे आहे - आता तिथे आहे. तिला फोन सुद्धा बरेच येत होते. त्या फोनचे रहस्य पाटणा स्टेशनवर उलगडलं. एक उंच निंच तरुण तिला भेटायला आला आणि दोघेही कोप-यात गुलुगुलू गप्पा मारीत उभे राहिले. गाडी निघाल्यावर तिने सांगितलं की "भैय्या आये थे !" आणि त्या भैय्याने आणलेली चॉकलेट्स मजेत खात बसली.
रात्रीचे जेवणही असेच बंडल असल्याने फक्त एकच थाळी माझ्यापुरती मागवली होती. बाकीच्यांनी आंबा, संत्री आणि घरून आणलेल्या चिवड्यावर भागवले. रात्री दीड वाजता सुरभीचे गाव आले. ती जाताना जुलेखाला झोपेतून उठवून निरोप घेऊन गेली. Good mannered girl.
मला पहाटे चारला जाग आली. बाहेर चक्क उजाडलेले होते. गाडी बंगालमधे आलेली होती. सारा निसर्ग बदललेला होता. सर्वत्र शेती, छोटी मोठी तळी, खजुराची झाडे, डोंगर द-या. हवा सुद्धा गार होती. खूप सुंदर आणि छान वाटत होतं. गाडी NJP (न्यू जल पैगुडी) ला पहाटे चारला पोचणार होती. पण ती आता दुपारी दोनला पोचेल असं दिसत होतं. रो. ताशीचा फोन आला, "गाडी आणि ड्रायवर सकाळी सहा पासून NJP ला वाट बघतोय. तुम्ही अद्याप आले नाही असा त्याचा मला फोन आला आहे. तुम्ही कुठे आहात ?" मी त्याला परिस्थिती सांगितली आणि दुपारी २ वाजता गाडीची व्यवस्था करायला सांगितलं.
आता गाडीचा, प्रवासाचा भयानक कंटाळा येऊ लागला होता. आम्ही घरातून बाहेर पडून पूर्ण २ दिवस उलटून तिसरा दिवस सुरू झाला होता. गाडी उत्तरोत्तर घाण होत चालली होती. फक्त AC असल्याने गरम होत नव्हते हाच त्यातल्या त्यात दिलासा होता. कुणाशी काही बोलावेसेही वाटत नव्हते. विषय सुद्धा सारे संपून गेले होते. त्यात आसामी ने या दिवसात सिक्कीम दार्जिलिंगला पाऊस असतो असे सांगितल्याने अधिकच चव बिघडली होती. झक मारली आणि या गाडीने आलो, त्याऐवजी विमानाने आलो असतो तर बरे झाले असते असे वाटू लागले होते. निदान गीतांजली सारखी वेळेवर व वेगाने धावणारी सुपरफास्ट गाडी घेतली असती आणि आधी कोलकाता केले असते तर बेस्ट झाले असते असे वाटत होते.
शेवटी एकदाचे दुपारी २ वाजता NJP आले. बाहेर पडलो तर नावाची पाटी घेऊन राजू नावाचा इसम थांबला होता. त्याच्या हातातल्या पाटीवर माझे नाव बंगाली पद्धतीने ’Bikash’ असे लिहिलेले वाचून आधी कळलेच नाही. मग लक्षात आल्यावर हायसे वाटले. त्याने वेटिंगचे १०० रु. जादा घेतले आणि १५०० रु. वेगळे घेऊन लाल रंगाच्या मारुती ऑम्नी मध्ये आम्हाला बसवले आणि आम्ही गंगटोकच्या मार्गावर रवाना झालो.