" स्वरनगरीत उलगडला अभिनेत्यांचा प्रवास "

विजयादशमीनिमीत्त स्वरनगरी रंगमंच येथे "अभिनेते व प्रवासगाणी" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काही निवडक अभिनेत्यांच्या अभिनय प्रवासावर हा कार्यक्रम आधारीत होता. "स्वप्नील रास्ते प्रॉडक्शन्स्" व "थर्ड बेल एंटरटेनमेन्ट" तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेत्यांशी संवाद साधून त्यांचा आत्तापर्यंत झालेला अभिनयाचा प्रवास या कार्यक्रमाद्वारे रसिकांसमोर आला. कार्यक्रमाचे दिग्दर्शन व निवेदन स्वप्नील रास्ते याचे होते. अरुण नलावडे, भार्गवी चिरमुले, संजय मोने, सुकन्या कुलकर्णी - मोने, प्रसाद ओक, मधुराणी गोखले - प्रभुलकर या अभिनेत्यांशी निवेदक स्वप्नील रास्ते याने संवाद साधला. गपागोष्टी, अनुभव, किस्से आणि गाणी असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. त्याचबरोबर सा रे ग म प अजिंक्यतरा प्रसाद ओक् व मधुराणी गोखले यांनी काही निवडक गाणी रसिकांसमोर सादर केली.

अरुण नलावडे यांनी आपले विचार मांडताना पूर्वीच्या मालिका व सध्याच्या मालिका यात् बराच फरक जाणवतो असे सांगीतले त्याचबरोबर श्वास चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आलेले गोड व हळवे अनुभव देखील सांगीतले. सुकन्या कुलकर्णी यांनी मी अपघाताने या क्षेत्रात आले व त्याचे चिज झाल्याचे सांगीतले. रंगभूमीबरोबरच चित्रपट व मालिका यांच्यावरसुद्धा मनापासून प्रेम करते असेही त्यांनी सांगीतले. संजय मोने यांनी आपल्या विनोदी शैलीत संवाद साधताना अनेक विनोदी किस्से रसिकांसमोर मांडले. कायम सह-अभिनेत्याची भूमिका मिळत गेल्यामुळे हळू हळू लिखाणाकडे जास्त लक्ष केंद्रीत केल्याचे सांगितले. आत्तापर्यंत केलेल्या विवीध चित्रपट, मालिका व नाटके यांचे लिखाण कसे होत गेले हेही त्यांनी थोडक्यात सांगितले. नायीका व खलनायीका अशा दोन वेगवेगळ्या भूमिका साकारताना खूप वेगळा अनुभव अनुभवायला मिळतो असे भार्गवी चिरमुले हिने सांगीतले. त्याचबरोबर नृत्य व योगसन ह्याकडेही तितकेच लक्ष्य देते असेही सांगीतले. प्रसद ओक व मधुराणी गोखले यांनी आता अल्बम व चित्रपटांमधेही गाण्यासाठी विचारले जाते असे सांगीतले. राधा ही बावरी, गोमु संगतीनं, ग साजणी, या रावजी यांसारखी काहि गाणी देखील त्यांनी सादर केली. प्रसादची पत्नी मंजिरी व मधुराणीची बहीण अमृता गोखले ह्यांना देखील रंगमंचावर आमंत्रीत करण्यात आले व त्यांनी आपले विचार मांडले. मधुराणीने संगीतबद्ध केलेले "असेन मी नसेन मी" हे गीत अमृताने तिच्यासाठी सादर केले. आयोजक गोविंद कुलकर्णी यांनी सर्व कलाकारांना मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला. एकंदरीतच भिन्न अशा संकल्पनेचा हा कार्यक्रम रसिकांची उत्स्फूर्त दाद घेऊन गेला.