श्री तशी(?) सौ

आरती रागारागाने घरी परतली, तिच्यामागून संदेशही.
आरती तणतणत म्हणाली,"तुला सांगितलं होतं आज मला त्या खेळात भाग घ्यायचा आहे. दरवेळी तुझं हे आपलं असंच. काय बिघडलं असतं तुझं? बायकोसोबत कशात भाग घ्यायला नको. बाकी चार मित्र भेटले की काहीही खेळायला तयार."
"अगं असं नाही. पण हे असले खेळ नुसते टाईमपास म्हणून असतात. तू ते जरा जास्तच मनावर घेतेस. मग जिंकलं तरी चार दिवस त्याच गोष्टीवर बोलणं आणि हरवल्यावर तर विचारायलाच नको. खायला मिळालं तरी नशीब मग.मागे एकदा रस्सीखेच मध्ये त्या काळेने मला हरवलं तर तू रोज मला खायला घालून नको करून सोडलंस. आता तूच सांग तो 'केव्हढा' आणि त्याच्यासमोर मी 'एव्हढासा' . तू काय मला चिरमुऱ्याचं पोतं बनवणार होतीस?"
काळेचं नाव घेतल्यावर आरतीला तो प्रसंग आठवून हसू आलं. बिचारा संदेश, किती प्रयत्न करत होता दोर ओढण्याची. आणि त्याची झालेली धावपळ.
आज झालं काय होतं? त्यांच्या सोसायटीचे स्नेहसंमेलन होतं. दर दोनेक महिन्यांत त्यांच्या सोसायटीतील लोक हे असले काही कार्यक्रम आयोजित करत. काहीवेळा चार लोकांत मिसळल्याबद्दल संदेशला आनंद व्हायचा तर आजच्या सारख्या काहीवेळा त्याच्या डोक्याला त्रासच जास्त व्हायचा.आज या संमेलनात, एक खेळ होता. काही जोडप्यांनी स्टेजवर यायचं.प्रत्येक व्यक्तीला एक प्रश्नावली देणार आणि प्रत्येकाची उत्तरे त्यांच्या साथीदाराने दिलेल्या उत्तरांशी पडताळून पाहायची. हा खेळ तसा 'घातक'च होता, म्हणजे जर तुम्ही दिलेली उत्तरे तुमच्या बायकोशी जुळली नाहीत की आली ना पंचाईत. मग काय घरात भांडणेच. 'तुला माझ्याबद्दल इतकंही माहीत नाही?','हेच ओळखलंस का तू मला इतक्या वर्षात?','तुझे माझ्याबद्दल काय विचार आहेत ते कळलं मला आज!' ,इ.इ. आता अशा खेळात भाग घेऊन भांडण होण्यापेक्षा भाग न घेतलेलाच बरा, असा सोप्पा विचार संदेशने केलेला. पण यावेळी खेळात भाग घेतला नाही म्हटल्यावर आरतीचा पारा अगदीच वर गेलेला. तिला सारखे आठवत होते, मागच्या वेळी ती शेजारची ज्योत्स्ना कशी मिरवत होती जिंकल्यावर.
आरती म्हणाली,"घरी दोघं एकमेकांचं तोंड नाही का बघेनात, आमच्यासमोर नुसती 'प्रेमं' यांची.('प्रेमं' हा आरतीचा आवडता शब्द, रागात असतानाचा.) मग चिडचिड नाही होणार? तरी बरं आपलं लव्ह मॅरेज आहे म्हणून,नाहीतर अजून किती ऎकून घ्यायला लागलं असतं तिचं काय माहीत? "
"अगं पण जाऊ दे ना आता. तू कशाला जास्त त्रास करून घेतेस", असं म्हणून संदेशने टि.व्ही. सुरू केला.
ते पाहून आरतीला अजूनच राग आला. तिने शेवटी मनातल्या मनात ठरवलेच की पुढच्या वेळी आपण खेळात भाग घ्यायचाच आणि जिंकायचेच.दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या आरतीच्या डोक्यात तोच विचार आला. तिने ठरविले की संदेशला माझ्याबद्दल काय माहीत आहे, नाही ते नंतर बघू, निदान मी तरी सुरुवात करते. संदेश ऑफिसला जायची तयारी करत होता. बराच विचार करूनही आरतीला संदेशचा आवडता रंग काही आठवेना. तिने त्याला आवरून घरातून बाहेर पडताना पाहिलं आणि जाणवलं याला तर कुठलाही रंग चांगला दिसतो. तिने त्याला आजपर्यंत अनेक शर्ट भेट म्हणून दिले होते, पण त्याने एकदाही हा चांगला नाही, आवडला नाही म्हणून नाक मुरडलं नव्हतं. अर्थात त्याला तरी कुठे लक्षात आहे माझा आवडता रंग. ......माझा आवडता रंग???ह्म्म्म्म्म?? तिलाही आता आठवेना की तिला नक्की कुठला रंग आवडतो. तिच्या कपाटात तर एव्हढे कपडे होते. उलट एखाद्या रंगाची साडी नाहीये म्हणून तिने संदेशला ती घ्यायला लावली होती. आता आली ना पंचाईत. तात्पुरता तिने त्या प्रश्नाचा नाद सोडला आणि कामाला लागली.
दोन दिवसात तिचा उत्साह थोडाफार ओसरला होता. संदेशला तर काय बरेच होते, असे स्फोटक विषय न निघतील तेच चांगले. तरीही त्याला मधून-मधून आरतीचे प्रश्न ऎकून शंका यायची की ही अजून त्या खेळाचा विचार करतेय की काय? तिने एकदा दोनदा त्याला विचारलं की 'तू आजकाल काही खेळायला जात नाहीस पूर्वीसारखा', 'तुला गाणं कुठलं आवडायचं रे?', 'तुझ्या नवीन बॉसचं नाव काय', इ.इ. तसे ते दोघं घरी आल्यावर गप्पा मारायचे की आज दिवसभरात काय काय झालं, पण लग्नाला ३-४ वर्षे झाल्यावर त्यातली उत्सुकता तशी जरा कमीच झालेली. तिला आधीचे, प्रेमात पडल्यावरचे, लग्नानंतरचे दिवस आठवले आणि पुन्हा एकदा पूर्वीसारखं सगळं व्हावं, प्रेमाने रहावं असं वाटू लागलं आणि ती तसा प्रयत्नही करू लागली. त्याच्यातील बदल लक्षात घेता-घेता तिला हे ही जाणवलं की तिच्यामध्येही बरेच बदल झालेत.तिच्या आवडी-निवडी थोड्या बदलल्या आहेत. पूर्वी ती ज्या छोट्या गोष्टींमध्ये रस घ्यायची ते कमी झालंय, तर तिचा उतावळेपणाही संदेशसोबत राहून कमी झालाय. या सगळ्यात दोन महीने कधी उलटून गेले कळलंच नाही. तिच्या शेजारणीनेच तिला आठवण करून दिली, "मग काय यावेळी घेणार ना भाग कार्यक्रमात? भेटू मग उद्याच. "
"हो, नक्की", आरती तिला म्हणाली, तर " आज संदेशशी बोलावंच लागेल. त्या खडूस जोत्स्नाने परत जाणून-बुजून आठवण करून दिलीय. सारखी खाजवून खरूज काढायची सवयच आहे तिला." असं मनातल्या मनात म्हणाली.
रात्री झोपताना संदेशला सांगितल्यावर तो हसायला लागला.
"अजून तुझ्या डोक्यातून ते खूळ गेलं नाही? तुला मी परत सांगतोय असल्या या खेळांनी का आपलं प्रेम किती आहे हे कळतं?" संदेश.
"पण मला उद्या त्या जोत्स्नाला उत्तर द्यायचंय." आरती म्हणाली.
"अगं तिला काही काम नाहीये. तू कशाला असल्या लोकांकडे लक्ष देतेस? आपण लहान आहोत का असले खेळ खेळायला?", संदेश.
"जाऊ दे तुला नाही कळणार. किती वेळा सांगितलं मी की मला आवडतं असल्या गोष्टीत भाग घ्यायला. आणि अशीच आहे मी, लहान म्हण की अजून काही. त्यात काही बदल नाही होणार. " आरती जवळ जवळ रडतच बोलली. थोडा वेळ ती त्याच्याकडे न बघता पडून राहिली. त्याच्याकडून काहीच उत्तर येत नाहीये म्हटल्यावर तिने वळून पाहिलं तर संदेश चक्क गाढ झोपला होता. आता मात्र तिला अगदीच राहवेना. त्याला आत्ताच्या आत्ता हाक मारून उठवायची इच्छा होतं होती आणि हे सांगायची की 'मला एखादी गोष्ट करायची आहे तर मला साथ देण्यासाठी, माझं मन राखण्यासाठी का होईना करावीस ना? अगदी हा हट्ट आहे म्हणू, पण मग तू माझा नवरा आहेस म्हणूनच तुझ्याकडे हट्ट करतेय ना?'. पण यातलं काहीच न बोलता ती उठून बाहेरच्या खोलीत आली.
आधीचे दिवस तिला आठवत होते जेव्हा संदेश, त्याची इच्छा असताना, नसतानाही तिच्याशी बोलायला मिळावं म्हणून तिच्यासोबत जात असे. तर अशा काही कार्यक्रमात मजा म्हणून भागही घेतला होता. त्या आठवणी काढता काढता तिला जरासं बरं वाटू लागलं आणि तिने ठरवलं की उद्याही आपण आधीसारखाच भाग घ्यायचा आणि आधीसारखीच मजाही करायची. मग तिने एक वही पेन घेतलं आणि गेल्या काही खेळांमध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरं काय असतील हे लिहायला घेतलं.
१.आवडती भाजी:.....ह्म्म्म... तशी मी केलेली कुठलीही भाजी त्याला आवडतेच. :-) आता मीच चांगलं जेवण बनवते तर त्याला आवडणारच ना? की त्यालाच कटकट करायची सवय नाहीये?...जाऊ दे पुढचा प्रश्न बघू..
२. आवडतं गाणं: कधी तरी म्हणाला होता मला 'मेरी दुनिया है तुझ मे कही....' पण आजकाल काय आवडतं माहीत नाही. तसंही मी जी गाणी लावते ती ऎकतोच ना तो?
३. त्याच्या बॉसचं नाव: पिल्लई की काही तरी म्हणाला होता. मध्ये काही तरी म्हणत होता की नवीन साहेब येणार आहे म्हणून.गेल्या काही दिवसांत,या भांडणात त्याला विचारलंही नाही त्याचं काय झालं म्हणून.
असा विचार करताना तिला कळलं की त्याचे जे गुण तिला आवडले होते ते अजूनही तसेच आहेत. तो तर अजिबातच बदलला नाहीये. त्याचा स्वभावच मुळी कधी कटकट न करणारा, आनंदी आणि दुसऱ्यांनाही त्रास न देणारा. आधीही त्याला जास्त उत्साह नसायचा असल्या गोष्टीत भाग घ्यायचा,मीच तर त्याला ओढून न्यायचे. तेव्हा उलट त्याचं असं स्वत:त आनंदी राहणं आवडायचं. मला जरा ऑफिसमध्ये काम जास्त झालं की मी किती त्रास देते घरी, हा मात्र काही न बोलता राहतो. आता तिला स्वत:वरच राग यायला लागला, त्याच्यावर चिडल्याबद्दल. त्याच्याबाबत त्या खेळातले प्रश्न विचारले तर मी काय उत्तर देणार? आणि त्याच्याविरुद्ध मी. मला कधी कुठला रंग आवडेल, तर कधी कुठला पदार्थ, तर कुठला सिनेमा याचा काही नेम नाही. माझ्या आवडी निवडी बदलत राहतात, तर तो तरी काय उत्तर देणार.बिचारा संदेश.....असाच काहीसा विचार करत आरती झोपून गेली.
सकाळी तिला असं सोफ्यावर झोपलेलं पाहून संदेशला कळलं की बाईसाहेब रात्री नीट झोपलेल्या दिसत नाहीयेत. मग त्याला तिच्याजवळ पडलेलं वही-पेन दिसलं. त्याच्यावर तिने खरडलेल्या ओळी पाहून थोडंसं हसू आलं आणि तिच्या या बालिशपणावर प्रेमही. ती अशी उत्साही, अवखळ, बालिश होती म्हणून तर मला आवडली. आणि आता तिने बदलावं अशी मी तरी अपेक्षा का करावी. आरती म्हणत होती ते बरोबर होतं, तिच्या समाधानासाठी का होईना मी हो म्हणायला हवं होतं. आज सकाळी एकदम त्याच्या प्रेमालाही भरतं आलं होतं म्हणा ना. त्याला एक कविता आठवत होती,
"तू आहेस तुझी, तुझ्या स्वप्नांची
तू असतेस बऱ्याच
वेळा तुझ्या कल्पनांची,
तुझ्या भावनांची आणि
केवळ तुझ्या कवितांची.

या सर्वांहूनही वेगळी असतेस
तू तुझ्या अनेक प्रिय व्यक्तींची,
त्यांच्यासोबतच्य़ा तुझ्या क्षणांची,
हरवून गेलेल्या त्यांच्या काही आठवणींची.

या सर्वांचा खूप हेवा वाटतॊ,
पण राग येत नाही,
कारण तू 'त्यांचं' असणं हेच
तुझं 'तू' पण आहे.
प्रत्येकवेळी तुझ्या नव्या रूपांना पाहताना,
मी मनापासून भुललो आहे. "

सकाळी अगदी आयता चहा हातात मिळाल्यावर आरतीलाही हसू आलं होतं. गेली रात्री गेली, आजचा दिवस नवीन या उत्साहाने तीही सगळं विसरून कामाला लागली. सगळं आवरून घराबाहेर पडताना संदेश म्हणाला,"तुला एक सांगू आरती? मला असं वाटतं वयानुसार प्रत्येक माणसांत, त्याच्या आवडी निवडीत थोडाफार फरक होतंच असतो. हे असले प्रश्न माझ्या तुझ्यावरील प्रेमाचं मोजमाप करू शकत नाहीत. वयानुसार,बदललेल्या आवडी निवडींसहित आपल्या प्रेमाला कसं स्वीकारतॊ यातच खरी परीक्षा असते. आणि काहीही झालं तरी, कितीही वय झालं तरी तूच माझी ऐश्वर्या आणि तूच माझी आवडती भाजी ! खाऊ का तुला?" असं म्हणत त्याने तिला जवळ ओढून घेतलं आणि आरती प्रेमाने त्याच्या मिठीत विसावली होती.
-अनामिका.