कविता

एक बातमी आलीये , माझ्या दोस्ताला म्हणे बरं नाही

काल परवापर्यन्त बरा होता, पण हल्ली काही खरं नाही.

पिन्जारलेले केस अन् चुरगळलेला वेष,

चप्पल आंगठा तुटलेली, गळा शबनम लटकलेली

सैरभैर चित्त आणि , हाती कागद लेखणी

मुद्रेवर पहिलटकरी भाव,

सतत काहीतरी हरवल्याचा आव.

रस्त्यात अचानक थांबतो, स्वतःशीच बडबडतो,

झोळीतला कागद काढून काही बाही खरडतो.

रोजच्याच गोष्टीत त्याला नवे अर्थ दिसतायत

चांगलं-चुंगलं ऐकावं,वाचावं अश्या इच्छा होतायत--

का कोण जाणे जीवाची फार घालमेल होतेय,

पावलागणिक त्याला नवीन ओळ सुचतेय.....

त्याला म्हणे वैद्याकडे नेऊन,

विचारलं त्याची नाडी दाखवून,

की ' माझं नक्की काय होणार आहे ? '

उत्तर मिळालं, " अभिनंदन,

तुम्हाला लवकरच एक कविता होणार आहे ! "