कवायत

एकदा कवी, ' कविता लिहायची' ठरवून,
पुढ्यात कागद ओढून,
त्यावर काटकोनात ले़खणी ठेवून
जय्यत तयारी करून,
बसला बैठक मारुन , पण...
काही केल्या स्फुर्ती येईना,
पुढचा शब्द त्याला सुचेना.

कवी हट्टाला पेटला,
' आज करायचीच ' पुटपुटला, आणि
झाली सुरुवात खोगीरभरतीला.

इकडून तिकडून ऐकले- वाचलेले
शब्द कच्चे- अर्धवट भाजलेले
कल्पनेतच ऊबवलेले, मात्र
वास्तवाची धग कधीच न लागलेले....

तीव्र इच्छेच्या कढईत, बळेच
त्या शब्दा-वाक्यांना लोटून,
अहंकाराच्या प्रखर आचेवर
कवितेचे आधण ठेवून,
हाती बेताच्या अनुभवाचा झार्‍या घेऊन
यमकांची बुन्दी पाडायला,
कवी लागला काव्य ढवळायला---

यथावकाश मनातून लेखणीत,
अन तिथून कागदावर, भरभर
ऊतरले ते शब्द अनेक
एकच गिल्ला करू लागले, म्हणाले,
" तुम्हीच जमवलेल्या आम्हा बाजारबुणग्यांची
कशी वाटतेय कवायत ? "