तुझ्यात मी

मी तुझ्या भवतीच आहे
सळसळतो वाऱ्यातून
मी तुला बघतोच आहे
लुकलुकत्या ताऱ्यांतून!

का कळेना हे तुला मी
या फुलांतून हासतो?
वाहणाऱ्या निर्झरातून
कधीच का ना भासतो?

मी सदाचा गात असतो
मी खगांची शीळ गं
बरसतो तव अंगणातून
मीच तो घननीळ गं!

होशी तू बेधुंद ज्याने
तोच तो मृद्गंध मी
नित्य जे तव ओठी येते
त्या गीताचा छंद मी!

आज वेडे का तरीही
एकटे तुज वाटते?
मी तुझ्या असण्यात असुनी
दुःख हृदयी दाटते?