शिवकल्याण राजा

मध्यप्रदेश सरकार तर्फे देण्यात येणारा "कालिदास" पुरस्कार शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणार आहे... त्यांनी सांगितलेले शिवचरित्र ऐकून, वाचून सूचलेल्या काही ओळी . 

ग्रहण सूर्यास लागे
पापभारे धरती डोले
अंधःकार घनघोर
पसरे पारतंत्र्याचा ।

रयत दीन बिचारी
त्राही त्राही होई
जुलमी फौजा शाही
लुटती दिशा दाही ।

मंदिरात देव नाही
वावरात माणूस नाही
आक्रोशे काळी आई
वैभवास वारस नाही ।

गोमाता भयभीत
गृहलक्ष्मी चिंताक्रांत
घरधनी जाई रणी
रक्षिण्या तीज न कुणी ।

अधर्म असा भयंकर
माजला हाहाःकार
म्लेंछास निर्दाळण्यास
अवतरी तारणहार ।

म्लेंछास त्या मारीन
स्वराज्यास स्थापीन
शपथ घेसी  तु   
रायरेश्वरा स्मरून ।

ती नजर तुझी करारी
फिरे सह्याद्रीवरी
आतुर लावण्या भगवा
गडकोट किल्ल्यांवरी ।

रणशिंग करी नाद
भगवा डोले गगनात
करी पराक्रमाची शर्थ
रणांगणी झुंझण्यात ।

बादशाही थरारे
सिद्धी, गोरे नमले
जिंजीचेही राज्य जिंकीले
ध्वज स्वराज्याचा चाले ।

छत्र धरे मस्तकी
वरदान भवानीचे हाती
स्वातंत्र्याचा गोंधळी
आईचा पोत नाचवी ।

लेकी, सुना सुखावती
मातीतून पिकती मोती
सुखाची वर्षा करी
गगन मस्तकावरी   ।

धन्य होई जिजामाता
सुखावे सारी प्रजा
सह्यगिरी हर्षित
तु शिवकल्याण राजा 
तु शिवकल्याण राजा ।