कैफ़ियत

तू बोलतेयस खूप काही
पण ते मला समजलेलंच नाही
समजून चुकलोय मी दुसरंच काही
जे तू कधी सांगितलंच नाही.

जे समजलंय ते फारसं
मला आवडलेलं नाही...
पण माझ्या आवडी-निवडीचं
तसं तुला काहीच पडलेलं नाही !

माझ्याकडे ज्याचं उत्तर आहे,
असा प्रश्न तुझ्याकडे नाही,
मला हवे असलेले प्रश्न तू
विचारायचा प्रश्नच येत नाही....

तुला प्रश्न विचारायची
मला कुठे छाती आहे ?
उत्तरादाखल जे ऐकावं लागेल
त्याची मनोमन भीती आहे.

मला जेव्हा कधीकाळी
तुला खूप सांगावंसं वाटेल
तेव्हातरी तुलाही...
ते ऐकावंसं वाटेल ?

मला बोलायचं असतं तेव्हा
तुलाही ऐकावंसं वाटावं,
मी जीवाचा कान करीन
तेव्हा तुलाही बोलायचं सुचावं.

माझे शब्द कष्टाने बाहेर पडतात,
त्यांच्याआड भित्र्या भावना दडतात.
माझं बोलणं ? त्याचं काही खरं नाही
तोंड उघडून नुसतं अश्रू ढाळणं बरं नाही.....

या वाहत्या आसवांचा दोष
तुझ्या माथ्यावर का यावा?
अपराधी भावनांचा बोजा
तू डोक्यावर का घ्यावा?

तू डोक्यावर घ्यावंस असं
आहे काय माझ्याकडे!
एक माझ्या दु:खाचं गाठोडं,
ते बरंय माझं माझ्याकडे.

माझी चूक आहे, माझ्या अपेक्षा....

आणखी चुका असतील, नव्हे आहेतच.
खंत आहे, पण तुझ्यावर रोष नाही;
चुका माझ्या, माझ्याच आहेत
त्यात तुझा काही दोष नाही.