दिनांक २४-१२-२००६ रोजी ‘बालकविता’ या सदरात, माझी पुढारी वर्तमानपत्रात प्रकाशित झालेली कविता.
आमची छोटीशी मनी
बसली होती दारात
साठवत बाहेरचं जग
आपल्या इवल्याशा नेत्रांत
सकाळच्या गारव्यात
कोवळ्या सोनेरी उन्हात
आहे कोणत्या विचारात
काय आहे तिच्या मनात ?
इच्छा खेळण्याची..
बाहेर जाण्याची..
मनसोक्त आनंदाची..
भावना निवांतपणाची..
पण तयार नव्हती ती अजून
बाहेर निवांत जाण्यास
कुत्र्या-बोक्यांच्या संकटांशी
दोन हात करण्यास
ती तर खेळत होती अजून
स्वतःच्याच शेपटीशी
तिला अजून झोपू वाटत होते
आमच्याच उश्याशी
खेळत होती ती
शिकत होती त्यातून
सुटण्यासाठी पुढे येणारॅ
प्रत्येक संकटातून
-रोहन जगताप