प्रेम ( स्वगत / नाट्यछटा )

खरंच सांगा, खरं प्रेम म्हणजे तरी नेमकं काय हो ?

आपलं संपूर्ण अस्तित्वच सुवर्णमय करुन टाकणारया या प्रेमाची घडणावळच आपल्या अंतःकरणात होत असताना, त्याचं कारण झालेला परिसस्पर्श आपल्याला बाहेर का शोधावा लागतो? स्वतःच्याच नाभीतून उमलणारया स्वर्गीय सुगंधाने वेडावून वणवण भटकणारया कस्तुरीमृगासारखी प्रेमात आपली गत का व्हावी ?

प्रेमाच्या गावाला जाणारा प्रवास म्हणजेच आयुष्य ! या यात्रेत खरं प्रेम नशीबाने भेटलंच, तर त्याची आपल्याला, आणि आपली त्याला आणि त्या भेटीनंतर आपली आपल्यालाच-- ओळख पटेल कशावरुन ?

मला वाटतं, आपल्याला भावलेलं आपलंच एक गोंडस प्रतिबिंब आपल्या वाटलेल्या माणसाच्या डोळ्यांत गवसणं,
म्हणजेच प्रेम !

त्या सोनेरी क्षणांपुरता का होईना, हा अनंत भासणारा अनुभव-- निदान आपल्यापुरता तरी खराच असतो, असं नाही वाटत ?

माझ्याकरता शाश्वत सत्य असलेल्या या अनुभूतीला मी खरं प्रेम मानलं तर त्यात गैर काय? तो ईश्वर तर प्रेमस्वरूपच आहे ना?

मग माझ्या प्रेमानुभवातलं मला जाणवलेलं देवत्त्व नाकारण्याचा अधिकार मी दुसरया कुणालाही नाही देणार !

का दोन मर्त्य मानवांकरता हे देवाघरचं देणं खरोखरच अशक्य आहे?
तसं असेल, तर प्रेम शोधत या मृगजळामागे का धावायचं आयुष्यभर ?
आत्मवंचनेचे आणखी सोपे मार्ग आहेतच की !

पण खरंच सांगा, प्रत्येक हळुवार उत्कट भावनेची उलटतपासणी आवश्यकच आणि शक्य आहे का? मला नाही पटत !

"मिळालं तर फक्त खरंखुरं प्रेमच मला हवंय!" असं म्हणत [float=font:brinda;place:top;background:eeeeff;color:52507F;]पूर्णतः निष्प्रेम जीवन जगत रहायची मिजास नाहीये माझ्याकडे. .. .. इतकी श्रीमंत मी कधी होईन असं नाही मला वाटत![/float]

जर ते मिळणार असेल, वीरचक्रासारखं,
प्रचंड इतमामात,
पण....... मरणोत्तर,

तर हवंय कुणाला इथे खर्र खुर्र प्रेम !