..............................................................
सोनचाफ्याचा सुगंध तुझ्या आठवांना येतो...!
..............................................................
सोनचाफ्याचा सुगंध
तुझ्या आठवांना येतो...
मंतरल्या दिवसांत
मला दूर दूर नेतो !
एका सोनेरी सांजेला
होतो भेटलो आपण
तुझा-माझा साक्षीदार
होता सुगंधला क्षण !
केली हळूच पुढे मी
फूलभरली ओंजळ
...गंध तुझ्या श्वासांमध्ये
आणि डोळ्यांत वादळ !!
माझे माळरानी जिणे
तुझ्यामुळे गंधाळले
...आता रितीच ओंजळ
फूल एकेक वाळले !
...कधी कातरवेळेला
जीव पार व्याकुळतो
डोह प्रशांत मनाचा
खोलवर डहुळतो !
सुकलेल्या, सुटलेल्या
पाकळ्यांना तो न गंध
गेले गेले निसटून
तुझ्या-माझ्यातले बंध !
...तरी माझ्या काळजात
जपले मी एक फूल...
एका सोनेरी सांजेची
मला पडलेली भूल...!!
- प्रदीप कुलकर्णी
..............................................................
रचनाकाल ः १४ फेब्रुवारी २००४
..............................................................