शिव-सूक्त

           कडेकपारीत उगवलेलं रानफूल, पुष्पराज गुलाबाप्रमाणे सौंदर्यसंपन्न,सुगंधी नसतं,पण म्हणून ते कधी गुलाबाची बरोबरी करू शकणार नाही असं मुळीच नाही,किंबहुना ते रानफुल या गुलबापेक्षाही श्रेष्ठ असतं जेव्हा ते माझ्या राजाच्या एखाद्या गडकोटावर उगवलेलं असतं.

              अशाच काही रानफ़ुलांची ओंजळ माझ्या राजांचे चरणी! बाबासाहेब अन अप्पा कवी यशवंत हे माझे प्रेरणास्त्रोत! बाकी कर्तिकरविती ती जगज्जननी आदिशक्ति तुळजाभवानी, या सर्वांस भक्तिभावे अर्पण......

                                                                   शिवसूक्त

राजियामाजी ऐसा राणा, जे ठायी सकळ राजयोग खुणा ।

शैशव्युत्पन्न,अखंड कार्यरत धर्मकारणे ॥१॥

समाजकारण ते धर्मकारण, धर्मकारण ते राजकारण ।

दुष्ट म्लेंछांचे निर्दालन, पीडित कष्टी स्वजनांचे पुनरूज्जीवन ॥२॥

साधुसंतांसी उत्थापन,खलीचे समूळ निर्दालन, अबल, दुर्बळांचे तारण ।

अखंड परोपकाराचे धोरण,ते हे राजधर्माचे कारण ॥३॥

धरित्री नव्हे ही भूमाता, कामधेनू ती गोमाता।

परस्त्री ही केवळ माता, अखंड रक्षिले सर्वांसी ॥४॥

क्षात्रतेज बळवंत, राजनिष्ठ कुळवंत, धन्य ही जिजाऊ,चरणी त्रिवार वंदन ।

उपरती जगज्जननी,स्फुर्तिदायिनी भवानी,बुद्धिचे आगर कारभारी धुरीण पंतजन ॥५॥

बाजी, मुरार, तान्हा, शिवा काशिद, स्वामीनिष्ठ अवघे,धारातीर्थ पावन ।

फेडिले जन्मजन्मांतरीचे ऋण,धन्य पुनित ही मऱ्हाटभूमी, दशदिशा सहस्त्रमुखे करिती शिवधर्म स्तवन ॥६॥

चैतन्यशिरोमणी तो हा जाणता राजा, नांदे जयेचेण सकळठायी चैतन्य मूर्तिमंत ।

उजवली कूस शिवनेरी, परमप्रताप प्रतापगडी,मस्तकाभिषेकी रायगड, पूर्वसंचित जया थोर, तो हा सह्याद्री भाग्यवंत ॥७॥

शिवदास.