प्रसिद्ध मराठी कथाकार कै. जी ए कुलकर्णी यांची एक "वहाणा" नावाची एक कथा आहे. त्यांच्या सर्वच कथा मला आवडतात ; पण ही विशेष.
ही कथा आत्मकथनात्मक आहे. एका औषध-विक्रेत्याचे (मेडिकल रिप्रेझेन्टिटिव्ह) हे एक निवेदन. या कथेची महत्ता समजून घ्यायला ती कथा मुळातूनच वाचायला हवी. त्या कथेच्या एका महत्त्वाच्या बिंदूपाशी निवेदक म्हणतो : "सार्या प्रवासभर टिकतील अशा वहाणा काही मला मिळाल्या नाहीत ! इतका प्रवास केला आणि इतक्या वहाणा बदलल्या , पण शेवटी माझे पाय अनवाणीच राहिले." परवा ही कथा (कितीतरीव्यांदा ! ) वाचत होतो आणि हे वाक्य मनात राहून गेले खरे.
वर उद्धृत केलेले वाक्य केवळ पायातल्या "वहाणां"बद्दलचे नाही हे वेगळे सांगायला नकोच. इथे "प्रवास" जो आहे तो आपल्या आयुष्याचा आहे आणि "वहाणा" आहे एक रूपक : आपल्या तत्त्वांचे , जपलेल्या मूल्यांचे , बर्यावाईट श्रद्धांचे , विश्वासाचे , मतांचे. उराशी बाळगलेल्या भल्या-बुर्या , भाबड्या आणि बनेल कल्पना , आदर्शवादी आणि हिशेबी विचारांचे. ज्याचे आयुष्य प्रवासात आहे त्याला सतत आपल्या वहाणा बदलाव्या लागतात. त्याच प्रमाणे जी व्यक्ती तर्कांच्या , तत्त्वांच्या , सिद्धान्तांच्या कसोटीवर येणार्या दिवसाला घासून पाहते , "सत्य-असत्याशी मन केले ग्वाही" अशी वृत्ती ठेवते तिला आपले श्रद्धांचे , विश्वासाचे , मतांचे गाठोडे बर्याचदा उलगडून बघावे लागते ; जुनेरी काढावी लागतात आणि नवी वसने घालून पुढील मुक्कामाला जावे लागते.
कमी अधिक फरकाने आपण सर्वांनी हा प्रवास केलाय. आपल्यापैकी अनेकांचा हा प्रवास अजून चालू असेलच - कळत नकळत.
आपल्या (किंवा आपल्याला माहीत असलेल्या कुणाच्या) प्रवासातील अनपेक्षित वाटा-वळणे आणि "बदललेल्या वहाणा" हा या चर्चेचा विषय होऊ शकतो.
[float=font:dhruvB;place:top;]स्वतःबद्दल सांगणे अवघड. त्यातून जर अनेक वर्षे लढलेला विचारांचा बालेकिल्ला कधी कोलमडला असेल तर त्याबद्दल सांगणे फारच कठीण[/float] , याची मला जाणीव आहे. पण जमेल तसे आपण सगळे लिहू शकू असे मला वाटते...
माझ्यापुरते बोलायचे झाले तर काही भ्रम-निरासाचे ("वहाणा" तुटण्याचे ) क्षण आठवतात. बर्यापैकी गुण मिळवून कॉलेजात आलो. एकदम इंग्रजी माध्यमामध्ये. त्यावेळी , अकरावीमध्ये उडालेल्या दांड्यांच्या वेळी "मायमराठी"च्या प्रेमाचा भंग झाल्याचे अजूनही लख्ख आठवते.
महाराष्ट्राचा नागरिक म्हणून शिवसेना-भाजप युतीने केलेला भ्रमनिरास अजून चांगलाच लक्षात आहे. पाच वर्षे काय हे लोक सत्तेवर आले ; सगळ्या अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडून गेला ..
अजून विचार करू जाता अजूनही काही आठवेल. येथील अनुभवी लोकांनी थोडे सविस्तर लिहिले तर आनंद वाटेल.