अळवाची सुकी भाजी

  • मध्यम आकाराची अळूची पाने - १२ ते १४
  • थालिपिठाची भाजणी - एक ते दोन वाट्या
  • हिरवी मिरची, कोथिंबीर
  • तेल व फोडणीचे साहित्य
३० मिनिटे
तीन जणांना पोटभर

अळूचे देठ बाजूला काढावेत आणी पाने धुऊन पुसून घ्यावीत. ती बारीक चिरावीत.

मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात.

तेल तापायला ठेवावे. धुरावले की मोहरी, हळद, वाटलेली मिरची घालून त्यावर चिरलेली अळूची पाने घालावीत. ज्योत बारीक राहू द्यावी.

सर्व एकजीव होऊन पानांना पाणी सुटू लागले की त्यात मावेल तितकी थालिपीठाची भाजणी चमच्याचमच्याने जिरवावी. मधूनमधून पाण्याचा हबका मारावा. पण सगळे मिळून साधारण अर्धी वाटी पाणी वापरावे. किंचित ओलसरपणा शिल्लक राहील एवढे बघावे.

त्यावर मीठ घालून एकजीव करावे आणि मंद ज्योतीवरच झाकण ठेवून हलकी वाफ आणावी.

वाढायला घेण्याआधी कोथिंबीर बारीक कापून घालावी.

(१) याला तेल भरपूर लागते, कारण भाजणीत तेल चांगलेच जिरते. दोन मोठ्या पळ्या तेल सहज लागते. जास्त घातले तर जास्त खमंग चव येते.

(२) यात अळू खाजरा नसल्याची खात्री करून घ्यायला लागते. कारण एरवी खाजरेपण शमवायला चिंच किंवा आमसूल वापरले जाते, पण या पदार्थात नाही.

हवे असल्यास आमसुलाचे पाणी करून भाजणी टाकायच्या आधी अर्धी वाटीभर टाकायला हरकत नाही. पण ती आंबटसर चव भाजणीला विजोड वाटते.

(३) कोंकणात याला "अळवाचा पळवा" असे खटकेबाज नाव आहे.

कोंकणातील पारंपारिक