मुगाची डाळ

  • पाउण वाटी मूग डाळ,
  • १ लहान कांदा, १ लहान टोमॅटो,
  • २-३ हिरव्या मिरच्या, १ लाल सुकी मिरची
  • १ चमचा गरम मसाला, लिंबाचा रस / चिंच
  • फोडणीसाठी तेल, कढीपत्ता, मोहोरी, जीरे, हिंग, हळद
  • मिठ, कोथिंबीर
३० मिनिटे
२-३ जण

कृती:
१) कांदा टोमॅटोचे मोठ्या चौकोनी फोडी करून घ्याव्यात. कूकरमध्ये मूगाच्या डाळीत कांदा-टोमॅटोच्या फोडी घालून डाळ शिजवून घ्यावी. कांदा-टोमॅटो डाळीबरोबर शिजवल्याने छान स्वाद येतो.

२) डाळ शिजली कि रवीने एकजीव करून घ्यावी. कढईत १ चमचा तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जीरे, हिंग, हळद, कढीपत्ता, मिरच्या घालून फोडणी करावी. त्यात शिजलेली मूग डाळ घालावी. हि डाळ घट्टसरच चांगली लागते त्यामुळे आवश्यक तेवढेच पाणी घालावे.

३) एक उकळी आली कि त्यात मसाला घालावा. लिंबाचा रस/ चिंचेचा कोळ आणि चवीपुरते मीठ घालावे, कोथिंबीर घालावी. गरम गरम तूप-भाताबरोबर हि डाळ मस्त लागते.

१. जर लसणीची चव आवडत असेल तर फोडणीत लसूण बारीक चिरून घालावी.
२. चिंचेपेक्षा लिंबाचा स्वाद जास्त चांगला लागतो.

आई कडुन.