प्रत्येक नात्याला वेगळा अर्थ
आपणच समजून घ्यायचा असतो
प्रत्येक गणित भिन्न; हिशेब
आपणच मांडून पहायचा असतो !
अर्थाचा अनर्थ झाला की
सगळाच गुंता होऊन जातो
कळत नाही कधी; केव्हा
बेरजेचा भागाकार होऊन जातो !
अनिश्चित नाते जरतारी
तरीही त्यात गुंतायचे नसते
सुंदर भासले जरी; तरी
धुक्याशी नाते जोडायचे नसते !
आभाळाचे देखणेपण
दुरूनच डोळ्यात साठवायचे असते
कातर क्षणी; कातरमनी
पावसाशी नाते जोडायचे असते !
तरीही... गडद संध्याकाळी
जेव्हा एकटेपण मनात दाटून येते
तुडुंब भरलेल्या डोहाभोवती
मग मीच कुंपण घालून घेते !
--- 'कृष्णडोह' मधून !