नाजूक काटा फुलतो अंगी
मधुर रसामध्ये जाई बुडुनी ।
तप्त अग्नीच्या संगे होतसे
काया पालट जणु एका जन्मी ।
शुभ्र केशरी मधुर असा हा
इवल्या तीळाचा होई हलवा ।
गोड बोला हो गोड बोला
मागे सारून द्या ती कटुता ।
हिरण्यगर्भ हा करी संक्रमण
तुम्हीच का मग असे राहता ?
विसरा आता जुनी मलिनता
सोडूनी या ती हीन दीनता ।
नव्या ऋतूंचे नवे चक्र हे
फिरे रवीच्या रथा संगे ।
नव्या उत्सवी मैफिल सजते
नव्या राग रंगांच्या संगे ।