सर्च इंजिन

सर्च इंजिन

नेहमीच्या गूगल सर्चपेक्षा आणखी असंख्य सर्चचे पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत . काहींमध्ये तर तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मिळते . उदाहरणार्थ , ' चाचा डॉट कॉम '. तिथे एखादा प्रश्न विचारला की दोन पर्याय तुमच्यासमोर येतात . एक निव्वळ सर्चचा आणि दुसरा तज्ज्ञांकडून ' लाइव्ह ' मार्गदर्शन मिळविण्याचा . मात्र त्यासाठी तुम्हाला या साइटवर नोंदणी करावी लागेल . लॉगीन नेम , ई - मेल आयडी आणि पासवर्ड वगैरे द्यावे लागतील . फुकटातली ही सेवा रजिस्टर्ड यूजर्सनाच उपलब्ध आहे . एखादा प्रश्न विचारला की साइटवरचा जाणकार माणूस त्याची उत्तरे देतो . असे लाइव्ह मार्गदर्शन फार कमी साइटवरून मिळते .

डॉगपाइल डॉट कॉम ' ही आणखी एक शोधसेवा आहे . तिचे वैशिष्ट्य असे की गूगल , याहू , विंडोज लाइव्ह , आस्क डॉट कॉम या सर्वांवरचे सर्च ती एकदम करते आणि अगदी मोजकेच निष्कर्ष तुमच्यापुढे सादर करते .

यंदाच्या जुलै महिन्यातले क्रमवारीने टॉप टेन असे : गूगल , याहू , एमएसएन अथवा विंडोज लाइव्ह , एओएल , आस्क , मायवेबसर्च , बेलसाऊथ , कॉमकास्ट , डॉगपाइल , आणि मायवे डॉट कॉम . यानंतर इतर सर्च इंजिन्सचा वापर होतो . ही यादी अर्थातच दर महिन्याला बदलत असते . पण साधारणपणे पहिले चार क्रमांक कायम राहतात . तरीही या यादीत नसलेली पण चांगली अशी काही सर्च इंजिन्स आहेत . ' टेक्नोरॅटी डॉट कॉम ' हे त्यातलेच एक . मुख्यत : ब्लॉगच्या सर्चसाठी ते वापरले जाते . ब्लॉगरविषयी सर्व माहिती इथे मिळते. कोणत्या प्रकारच्या ब्लॉगचा अधिक शोध घेण्यात आला आहे , त्याची यादी दिसते . म्हणजे तुम्हालाही त्यातलाच ब्लॉग शोधायचा असेल तर सरळ तुम्ही त्या लिंकवर जाऊ शकता . इथेे दोन प्रकारचे सर्च उपलब्ध आहेत . एक म्हणजे सर्वांत नवीन ब्लॉग कोणता आहे ते आधी दिसेल व जुना ब्लॉग शेवटी दिसेल . दुसऱ्या प्रकारात सर्वात जास्त वेळा जो ब्लॉग पाहिला गेला असेल , तो आधी पडद्यावर येतो . नंतर उलट्या क्रमाने ब्लॉग दिसतात . म्हणजे सर्वात लोकप्रिय ब्लॉग कोणते ते पटकन कळते.

कॉसमिक्स डॉट कॉम ' ही आणखी एक सर्च साइट . ती काही प्रमाणात मोफत आणि काही प्रमाणात पेड साइट आहे . इथे विषयानुसार शोध घेता येतो . उदाहरणार्थ , आरोग्य , वाहने , अर्थव्यवहार , राजकारण वगेरे . फुकटातला सर्च चांगले रिझल्टस देत नाही ; पण पैसे भरून केलेला सर्च अत्यंत उपयुक्त माहिती देतो . विषयवार सर्चचे पर्यायही उपलब्ध आहेत . गूगलवर पुस्तकांचा सर्च घेता येतो . काही वेळा त्या पुस्तकातली काही पानेही वाचता येतात . एखाद्या लायब्ररीत असावी अशी विषयवार रचना या साइटवर मिळते . पुस्तकाचे नाव माहीत असेल तर प्रश्र्नच नाही . ते टाइप करून थेट सर्च करू शकता . साहित्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशी ही साइट आहे .

धन्यवाद