मृगनयनी

अनेक वर्षामागे आजच्याच या दिनी, एक चांदणी अवतरली आसमंतातुनी

नाजुक, शीतलं, अवखळ, चंचल, अन मनस्वी रमणी ॥१॥

    

अवघी सृष्टी गेली खुलूनी, आनंद वनी भुवनी

बाळ लागले दुडुदुडू करण्या, सख्यांसह अंगणी ॥२॥

    

दिस उलटले दिसामागुनी, मास ही गेले निघुनी

अन चांदणी वयात आली, नितांत सुंदर तरुणी ॥३॥

   

एकेदिवशी राजकुमारे, यौवन ते पाहिले

अन नजरेच्या त्या पाशा मग, मन ते वेडे गुंतून गेले ॥४॥

    

ती ही भाळली नृपपुत्राच्या, पौरुषत्वावरी

जीवन तयासी अर्पण करिते, मदनाची मंजिरी ॥५॥

    

दंतकथेतील परीप्रमाणे, तिचे भोवताली ते असणे

तिच्याच स्वप्नी गुंग ही होणे, तिच्या पायी जागणे ॥६॥

    

पाहत तिजला स्वप्नी, कुमार बोलला मनी...

तिजस्वप्निच्या दुनियेमधुनी, मज उठवू नये कधी कुणी

मजवेड्याचा जीव असे ती, सुकांत मृगनयनी ॥७॥