अमर प्रेम

ज्योत समईची तेजस्वी
अंधार जाळत होती
स्वछंदी पतंगाची नजर
अवचित तिच्यावर पडली

क्षणात ज्योतीच्या तेजाची
मोहीनी त्याला पडली
दिशाहीन त्याच्या आयुष्याला
मंझिल मिळून गेली

प्रेम-दिवाण्या पतंगाने
झेप तिच्यावर घेतली
आवेग बघून त्याचा
ती सुद्धा फडफडली

वेडा रे तुझा ध्यास
क्षणभंगुर हा सहवास
येऊ नकोस आसपास
ज्योती म्हणे पतंगास

पतंग म्हणाला ज्योतीला
जळेन तुझ्या सोबतीला
अमर करेन प्रेमाला
प्राण देऊन आहुतीला

होई ज्योतीची थरथर
जेव्हा जळे तो प्रेमवीर
प्रेम त्यांचे अमर
पण मिलन असे क्षणभर

-------हेमंत मुळे
रचना काल - २३-०१-२००८