बेलमची गुहा

फारा दिवस बेलमला जायची इच्छा मनात होती पण संकल्प सिद्धीस नेता नेता नवे साल उजाडले. अस्मादीक आणि आमची मित्रमंडळी असा चौघा जणांचा कम्पू होता .. बेंगळुराहुन आम्ही हम्पी एक्सप्रेसने निघालो.आमचे बरेचसे बेत असे आयत्या वेळेस ठरत असल्यामुळे रेल्वेचे आरक्षण म्हणजे अशक्य गोष्टच होती.
बेलमची गुहा, दक्षिणेतील सर्वाधीक लांबीची गुहा आहे. किंबहुना जवळपास तीन किलोमीटर लांबीची ही गुहा भारतातील सर्वाधीक खोल गुहांमध्ये दुस-या क्रमांकावर आहे. स्थान : आंध्रातल्या कर्नुल जिल्ह्यात कोलिमगुंड्ला तालुका.
आमची गाडी भल्या पहाटे चार वाजता गुत्ती जंक्शनवर पोहचली. इतक्या भल्या पहाटे तेही रेल्वेच्या "शाही" गिरद्यांमधुन उठणे जीवावर आले होते पण काय करता ?
रेल्वेच्या मार्गावरचे जंक्शन असल्याने गुत्तीसारखे आडगावाने सुद्धा कात टाकली होती. आता येथुन बेलमला जाणारी बस पकडायची होती. आडगावातले बसस्टॅंड, असून असून कितीक दूर असेल असा विचार करुन आम्ही अकरा नंबरची बस पकडली म्हणजे चालायला सुरुवात केली. गाव संपून हायवे सुरु झाला तरी स्टॅंड काही दिसेना. रस्ता चुकला की काय? रात्र जागवण्याची अखिल भारतीय परंपरा गुत्तीतल्या कुत्र्यांनी सुद्धा इमानेइतबारे पाळली होती. पण वाट दाखवण्याचे काम कोणी मनुष्ययोनीतील प्राण्यानेच करणे भाग होते. आमच्या सुदैवाने कोप-यावरचे एक म्हातारबुवा जागे होते. बसस्टॅंड या प्रश्नाला बुवांनी तेलुगुमध्ये "सरळ जा" असे उत्तर दिले. आम्हा चौघांमध्ये ( २ मराठी, एक राजस्थानी आणि एक कानडी ) एकालाही तेलुगु येत नाही पण मनुष्याच्या अंतरीच्या भावना वाचायला दक्षिणेतल्या दीड वर्षाच्या वास्त्वयात शिकलो होतो. आता या शिदोरीवर जगाची मुलुखगिरीवर सहज जाऊ शकतो.
बुवांनी दाखवलेल्या रस्त्याने चालायला सुरुवात केली. हा रस्ता म्हणजे प्रत्यक्षात महामार्ग होता, चहुकडे अंधार मस्त अंधार होता आणि क़ृष्णपक्ष असल्याने वर चांदण्या लुकलुकत होत्या. यात सगळ्यात ठळकपणे चमकणारा तारा शुक्राचा असल्याची आमची खात्री होती. रस्ता लवकर सरण्याचे नाव घेत नव्हता. पण शुक्राची ही तेजस्वी तारका आमचा मार्ग प्रशस्त करत होती !!! लवकरच या तारकेचा स्त्रोत शुक्र नसून कारखान्याचा धुराड्यावरचा दिवा असल्याचे ध्यानी आले. चारेक किलोमीटर चालूनही बसस्टॅंड काही दिसत नव्हता. सुदैवाने एक टपरी उघडी होती. चहाचे इंधन पोटात्त टाकले. ओक्क रुपये ओक्क ग्लास अशी णाल रुपियालु - चार रुपयाच्या किमयेने आम्हा पामरांना चालते केले. स्टॅंड वर पोचल्यावर बेलमची गाडी नुकतीच गेली व पुढची दीड तासाने अशी सुवार्ता मिळाली. मर्फीचा नियम सर्वकाळी व सर्ववेळी लागु असल्याचा आणखी एक पुरावा !

शेवटी बेलमच्या दारी पोहचलो.गुहा नऊ वाजता उघडते व सर्व दिवशी उघडी असते याची खात्री आम्ही आदल्या दिवशी केली होती. प्रत्यक्षात नऊ म्हणजे साडेनऊ, दहा साडेदहा यातील काहीही असू शकते हे तिथे गेल्यावर समजले.
गुहेच्या बाहेर गौतम बुद्धांची मोठी मूर्ती आहे. ही गुहा बौद्धभिक्षुंची तपोभूमी होती. विकीपिडीयाच्या नोंदीनुसार १८८४ साली याची पाश्चात्य जगाला पहिली ओळख झाली. यानंतर ही या जागेची महती समजण्यास शंभर वर्षे जावी लागली. चित्रावती नदीच्या खणन कार्याने या गुहेची निर्मिती झाली. भूगर्भशास्त्रातील यच्चयावत नमुने या जागी दिसतात.
गुहेच्या प्रवेशदारी पोहचण्यास चक्क २० एक फुट उतरावे लागते. गुहेत जाणे थरार असेल अशी आमची कल्पना होती. पण प्रत्यक्षात्त धोक्याचे सर्व मार्ग बंद करुन, मंद प्रकाश व हवेच्या झरोक्यांची सोय करुन आंध्रप्रदेशाच्या पर्यटन खात्याने वाट एकदम सोपी करुन टाकली आहे. थोडे पुढे जाताच चुन्याचा एक उलटा स्तंभ तुमचे स्वागत करतो. याचे नाव सिंहद्वारम. दक्षिणेतल्या मंदिरात गर्भगृहाबाहेरच्या दालनात असे स्तंभ असतात. म्हणून याचे नाव सिंहद्वारम.
खोली जशी वाढु लागते तशी गरमीही वाढु लागते. डोळे हळुहळु अंधाराला सरावतात. पुढे एका ठिकाणी रस्त्याला चक्क दोन फाटे फुटले. बहुमताने आम्ही उजव्या बाजुस जाण्याच निर्णय घेतला. उजव्या बाजूची ही वाट पुढे पाताळगंग़ेस जात होती. तर डाव्या बाजुने क़ोटीलिंगलु. गुहेतल्या जागांची ही नावे कल्पक होती पण ही मुळ नावे होती का हे मात्र समजले नाही. गुहेतली आणखी एक प्रेक्षणीय जागा म्हणजे ध्यान मंदीर. या जागी बौद्धकाळातील हजारो चीजा सापडल्या. अजिंठाच्या गुहेत बौद्ध कलेचे नमुने ठायीठायी आढळतात येथे मात्र त्यांची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवते. हजारो वर्षांपुर्वी उपग्रह वा कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान नसतानाही अशा जागा त्यांना माहित होत्या याचे मात्र मनस्वी कौतुक वाटले. भारत जणु त्यांना तळहातावरील रेघांसारखा माहीत असावा.
एकुण तीन किलोमीटर भागापैकी केवळ निम्मा भाग सध्या आम जनतेस खुला आहे. हे दीड किलोमीटर सुद्धा एक छान "थ्रिल्" देतात. बारिक होत जाणा-या वाटा, अंधार, गुदमरत होत असताना अचानक येणार हवेचा झोत सारे काही स~~~ही !!!

दुवा क्र. १