'तो' झुलत झुलत येतो

'तो' रोज येतो क्वार्टर घेऊनी

सोबत थोडा 'चकणा' खाऊनी

कधी गटारीच्या पाण्यातुनी

घरी पोहोचतो अलगद वाहुनी

    

'त्या'ची आहे बातच न्यारी

मना सारखा प्रश्न विचारी

भोवतालीची दुनिया सारी

मज का दिसते झुलणारी ?

    

देशी असो की विलायती

दोहोंवरती 'सेम'च प्रीती

एखादा घोट जाता पोटी

क्षणभरातच मती गुंगती

    

तसाच उठतो गुत्ता सोडत

हालत डुलत अन तरंगत

चालू लागतो स्वतः सावरत

दिसेल त्याला शिव्या घालत

    

कधी कधी तरी वात्रट कार्टी

त्याच्या भोवती गोळा होती

'तो' ची मग मैफिल रंगती

त्या टवाळ पोरांसंगती

     

घराजवळ 'तो' येतो

अन दारातच थबकतो

आत जाण्यापूर्वी पहिला

बायकोचा मार खातो

   

असे हे त्याचे जीवनचक्र

कधी न पडला खंड

बायकोकडून मार देखिल

कधी न जाहला बंद

    

कुणी म्हणे 'तो' तळीराम

कुणी बोले दारुडा

कुणी म्हणे 'टाकी फुल्ल'

तर कुणी बोले बेवडा

                            - श्रीयुत पन्त