मल्टीयोगा

मला कळविण्यास खूप आनंद होतोय की आज माझं 'मल्टीयोगा' (अ प्लॅटफॉर्म फॉर कम्प्लीट हेल्थ बॉडी, माईंड ऍण्ड इंटेलेक्ट) एक महिन्याचं झालं. सध्या इथे येणार्‍या महिलांची संख्या दहा आहे त्यात अठरा वर्षापासून साठ वर्षापर्यंतच्या वजन वाढवण्याकरिता, स्वास्थाकरिता व अर्थात जास्त संख्या वजन कमी करणार्‍यांची आहे.

मल्टीयोगा हेल्थ क्लब आहेच पण त्यात 'किचन कॉर्नर' आहे त्यात 'आम्ही सार्‍या सुगरणी' ह्या कार्यक्रमा अंतर्गत महिन्यातून एकदा तद्न गृहिणीकडून काही खास पदार्थ शिकता येतील.'बुकवर्म इन्न' अंतर्गत वाचनालय चालवण्यात येते आणि 'विंडोज' मध्ये संगणक इंटर्नेटचा वापर शिकवण्यात येतो.

३० डिसेंबरला माझी मैत्रीण बरखा माथुर(पत्रकार) हिच्या हस्ते सरस्वतीच्या मुर्तीसमोर द्वीप प्रज्वलन करून उदघाटन करण्यात आलं.  त्यावेळी मल्टीयोगा उघडण्यापाठीमागची संकल्पना व्यक्त केली ती अशी:

मी गेली पंधरा-सोळा वर्ष अनेक शाळांमधून नोकरी केली. माझं बीएड झालेलं नाही त्यामुळे पुर्ण पगार नाही तसेच शिकवण्याच स्वातंत्र्य नाही त्यामुळे नोकरीत काही 'राम' वाटेनासा झाला म्हणून 'रामराम' ठोकला. २ वर्ष पुर्णवेळाच गृहिणीपद भूषविलं. तसे छोटे-मोठे उद्योग सुरु होते आणि वाचनाची आवड असल्यामुळे वेळ कसा घालवावा हा प्रश्न नव्हता. पण शेवटी किती वेळ वाचणार अन किती वेळ टीव्ही पाहणार? कोपर्‍यात धूळ खात पडलेला संगणक मला बोलावू लागला. मी ह्या मित्राशी दोस्ती काय केली, माझ्यासमोर एका नव्या दुनियेची खिडकी उघडल्या गेली. सुरुवात परदेशी असणार्‍या भावा-बहिणींना मेल पाठवून झाली. मग शोध घ्यायला शिकले. एक दिवस 'मनोगत्'चा शोध लागला. चर्चा, लेख पाककृती वाचू लागले. प्रतिसाद देऊ लागले. आता काही लिहावेसे वाटू लागले पण काय लिहायचे? पाककृती नक्कीच लिहिता येईल. पाककृती लिहू लागले. आपण लिहिलेली साधीशी पाककृती जगभरात वाचल्या जातेय ह्याचा अतिशय आनंद झाला. आता मलाही जगभरात काय चाललयं हे कळू लागलं ह्या सगळ्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. मुलांनाही आईचा अभिमान वाटू लागला की ती आज काळाबरोबर आहे.