कधी उगाचच...!

..................................................
कधी उगाचच...!
..................................................

कधी उगाचच ...

कधी उगाचच
मजेत गाणे गावेसे वाटते !
कधी उगाचच
उदासवाणे व्हावेसे वाटते !

कधी उगाचच
जगावेगळी स्वप्ने पडती मला...
कधी उगाचच
स्वप्नच स्वप्नी यावेसे वाटते !!

कधी उगाचच
बरे वाटते भ्रमातले हे जिणे
कधी उगाचच
मृगजळातही न्हावेसे वाटते !

कधी उगाचच
असे वाटते - जवळ कुणीही नको
कधी उगाचच
दूर स्वतःला न्यावेसे वाटते !

कधी उगाचच
अनामिकेचा आठव दाटे उरी
कधी उगाचच
दान जिवाचे द्यावेसे वाटते !

कधी उगाचच
बरी वाटते उन्हातली ही तृषा
कधी उगाचच
चांदण्यातही न्हावेसे वाटते !

कधी उगाचच
झूट वाटते ही कविताबिविता !!
कधी उगाचच
सर्व सोडुनी द्यावेसे वाटते....!

कधी उगाचच ...कधी उगाचच ...

- प्रदीप कुलकर्णी

..................................................
रचनाकाल ः १२, १३ ऑगस्ट २००४
..................................................