प्रेमात तुझ्या...

नकळत घडले सारे काही, पडले अन प्रेमात तुझ्या ।

प्राण गुंतले, चित्त हरपले, मादक या नयनात तुझ्या ॥

श्यामल वर्ण, सतेज कांती, मुख चंद्रमा चमचमता ।

ताम्रसुरेची नशा अनोखी, लालस या ओठांत तुझ्या ॥

कधी खुणेने जवळ बोलवी, अशी मूक देहभाषा ।

कधी लज्जेने चूर करी, संकेत असा हास्यांत तुझ्या ॥

कधी ओठांचे नाजुक चुंबन, कधी हलकीशी कमळमिठी ।

कधी दिलाचा वेग वाढवी, आवेग असा बाहूंत तुझ्या ॥


होती पूर्वी एक किशोरी, सुजाण, सक्षम अन मुक्ता ।

आज कोण ही प्रेमदिवाणी, कैद पुरी कैफात तुझ्या ॥