तू नव्हाळीतली...

.................................................
तू नव्हाळीतली...!
.................................................

तू नव्हाळीतली
वेल नाजूकशी
लाजरी साजरी...!
चुंबनांची फुले
मी किती रेखिली
गौर देहावरी...!

तेज आले नवे
रोमरोमावरी
रंग हिरवा नवा...!
तूच केलीस ना ?
अत्तरासारखी
भोवतीची हवा...!

तू मला जे दिले
आणि मी जे तुला
दान काहीतरी...
सांगता ये न ते...
काय आहे, परी-
छान काहीतरी !!

रिक्त होऊनही
तृप्त झालो किती
काय सांगू तुला ?
जन्म माझा-तुझा
आज झाला जणू
चांदण्याचा झुला

मी तुला वेढले...
वेढ तूही मला
वेढ आसासुनी...!
मी सखाही तुझा...
जन्म घेईनही
मी तुझ्यापासुनी...!!

- प्रदीप कुलकर्णी
.................................................
रचनाकाल ः १० डिसेंबर २००४
.................................................