"नाही! आता हे चालणार नाही!! या राज्यात मराठी माणसाची कुचेष्टा!! माझ्या मर्द मराठ्यांनो आता तुटून पडा!"
अस म्हणत 'राजां'नी गर्जना केली आणि हजारोंच्या संख्येने मराठा गनीमाच्या मुलुखात- शहरे 'मुंबईत' घुसला!!
(संदर्भ - 'सकाळ' बखर. शके २००८-३-फेब) सरदार अबू आझ्मीच्या गोटावर त्याने जबरा मारा चालवला!
केवळ मराठी माणसावर चाललेला अन्याय थांबवण्याच्या शुद्ध हेतूने अनेक पान्वाले-पाणीपुरीवाले यांना धरून त्यांचा समाचार घेण्यात आला. नाशकात होळी पेटली! संभाजीनगर जळाले, पुणे पेटले!!
सुमारे १०-लाखावर नुकसान झाले! (संदर्भ - 'सकाळ' बखर. शके २००८-तारीख माहीत नाही पण ६-फेब ते १५फेब दरम्यान)
मात्र यामुळे मराठी माणसाची मान उंच झाली!! बसा जळल्या -हरकत नाही! पण मराठी माणसाची छाती रुंदावली! अनेक भूमीपुत्रांवरहोणारा अन्याय दूर झाला!
वाह!तिकडून सरदार अमरसिंह,सेनापती लालूसिंह यादवजी या सारखे धुरंधर गर्जले! "भारत सर्वांचा आहे!!"
काही दिवसांनी निवडणुका येतील, ही बात जरा गौण आहे!
अमरसिंह साहेब महाराष्ट्रातल्या बांधवांसाठी काय करत होते आत्तापर्यंत ? ही बाब जरा गौण आहे!
लालूसाहेबांनी आत्ता पर्यंत स्थलांतर थांबवण्यासाठी काय केल? -- ही बाब जरा गौण आहे!
मराठी माणसाला एकही नोकरी जास्त मिळालेली नाही या सगळ्या धबडग्यात ही बात जरा गौण आहे!
सगळ्या जळालेल्या बसेस ह्या मराठी बहुसंख्य असलेल्या भागात जाळल्या गेल्या ही बाब जरा गौण आहे!!
अमरसिंह काय लालूयादव काय, राज काय, आता पर्यंत यांनी 'आपल्या' लोकांसाठी किती नोकऱ्या मिळवून दिल्यात ?
जाऊ द्या ती बाब जरा गौण आहे!!
जळणारे जळतील हसणारे हसतील , अस म्हणत वर्तमानप्त्र वाचणारे गप्प बसले ही बाब तर अजिबातच गौण आहे!!