कांचनपरी
सकाळ, दुपार अन संध्याकाल
चालती गुंफून हाती हात
वेगळ्या असून बहिणी
मी एक त्या तिघींमधली !!
पहिली, दुसरी की तिसरी
तिघींमधली मी कुठली
तिघींमधली मी मधली
मधली, मधली मी मधली !!
सकाळची किरणे कोवळी
संध्याकाल जरा हळवी
इथून सारख्या मज दोघी
मधली, मधली मी मधली !!
एक सर रिमझीम आठवांची
दुरून साजरी स्वप्नपरी दुजी
मी दोघींना धरून उभी
मधली, मधली मी मधली !!
सकाळ सरली तगमग मनी
जगून घेते म्हणून तापही
चटके चटके मला चंदनी
मधली, मधली मी मधली !!
भर दुपारी बनून सावली
मीच माझी बघ झाले आई
राबराबता स्मित हसणारी
मधली, मधली मी मधली !!
झेलू दे मज किरणे माथी
तीच उद्यासाठी सावली
धम्मक पिवळी कांचनपरी
मधली, मधली मी मधली !!
सकाळ घेऊन काखोटी
संध्येची मी बनेन काठी
तिघींमधली मी कुठली
मधली, मधली मी मधली !!
स्वाती फडणीस..........................२००७